हॉटस्पॉटमधून सोनईची आज होणार सुटका

हॉटस्पॉटमधून सोनईची आज होणार सुटका

14 दिवस पूर्ण; शासकीय नियमानुसार दुकाने चालू होण्याची चिन्हे

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनईच्या त्या गल्लीत मयताचे नातेवाईक व संपर्क आलेले स्री पुरुषांना करोना संक्रमण झाल्याचे स्राव तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर सोनईत लागू केलेल्या लॉकडाऊनची lockdown 14 दिवसांची मुदत आज शुक्रवारी सकाळी संपत असून त्यामुळे आज दुकाने व्यवसाय सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

करोना संक्रमित रुग्ण आढळून आल्यानंतर सोनईत 14 दिवसांचा हॉटस्पॉट Hotspot प्रशासनाने घोषित कलेला होता व त्याची मुदत आज 24 जुलैचे सकाळी 8 वाजेपर्यंत आहे. आता सोनईत व्यापार दुकाने बाजारपेठ सुरु करणेचे मागणीसाठी सोनई व्यापारी असोसिएशनचे सदस्य सोनई पेठ महावीर मार्ग येथे जमले.

ग्रामपंचायतशी संपर्क साधून व्यवसाय सुरू करणेबाबत चर्चा झाली. यावेळी नेवासा तहसीलदारांशीही संपर्क साधण्यात आल्याचे व्यापारी संघटना अध्यक्ष कारभारी डफाळ व उपाध्यक्ष शिवाजी बाफना यांनी सांगितले. चर्चेनुसार शासकीय नियम पाळून आज शुक्रवार 24 जुलै रोजी सकाळी 9 ते 5 दुकाने चालू करणेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दादासाहेब वैरागर, सदस्य नितीन दरंदले, उपसरपंच संदीप कुसळकर व सदस्य मनोज वाघ, सखाराम राशिनकर यांनी याबाबत भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवले आहेत.

दरम्यान घोडेगाव येथे एका व्यक्तीने खासगी लॅबमध्ये दिलेला स्वॅब आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. सोनई येथून क्वारंटाईन केलेल्यापैकी 3 जणांना डिस्चार्ज दिला असल्याचे आरोग्य विभागाकडून समजले आहे. आजचे व्यापारी व ग्रामपंचायत सदस्य चर्चेला तलाठी अथवा ग्रामसेवक व पोलीस प्रशासन यापैकी कोणीही उपस्थित नव्हते अशी माहिती मिळाली आहे. माजी उपसरपंच उदय पालवे, संतोष क्षीरसागर बैठकीस उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com