
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा (ता. नगर) येथील सनराईज हॉटेलवर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणार्या बांगलादेशच्या महिलेची गुरूवारी सायंकाळी सुटका केली. याबाबत तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर जगताप (पूर्ण नाव माहीत नाही, रा. हॉटेल सनराईज नगर-सोलापूर रोड, वाकोडी फाटा), संतोष सत्यभान काळे (वय 28 रा. साई आनंद मंगल कार्यालयाचे मागे शेंडी, मूळ रा. वाघगल्ली, नालेगाव नगर), अमीन (पूर्ण नाव माहित नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे येथील समाजसेवक संदेश किसन जोगेराव (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. वाकोडी फाटा येथे सनराईज हॉटेलवर वेश्याव्यवसाय होत असल्याची माहिती शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांना मिळाली.
त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या पथकाने सनराईज हॉटेलवर छापा टाकून एका बांगलादेशीय महिलेची सुटका केली. यातील मयुर जगताप हा स्वतःच्या फायद्याकरिता पीडितेला दोघांच्या मदतीने हॉटेलमध्ये येणार्या ग्राहकांबरोबर शरीरसंबंध करण्यास भाग पाडून उपजिविका करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.