जेवण नाकारल्याने तरुणांची हॉटेल मालकासह कर्मचार्‍यांची धुलाई

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरणावर पडदा
जेवण नाकारल्याने तरुणांची हॉटेल मालकासह कर्मचार्‍यांची धुलाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

हॉटेलमध्ये जेवण नाकारल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेल मालकासह या हॉटेलमधील कर्मचार्‍यांची जोरदार धुलाई केल्याची घटना सोमवारी रात्री अकोले रस्त्यावरील हॉटेल मध्ये घडली. या हाणामारी मध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका माजी नगरसेवकालाही मारहाण झाल्याचे वृत्त आहे.

संगमनेर शहरातील 6 तरुण या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी रात्री अकरा वाजता गेले होते मात्र हॉटेलच्या मालकाने वेळेचं कारण सांगत त्यांना भोजन नाकारले. यामुळे हॉटेल मालक व युवकांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी हॉटेलचे कर्मचारी एकत्र जमा झाले त्यांनी या युवकांना खडसावल्याने त्यातून हाणामारीला सुरुवात झाली. हॉटेलमधील वेटर्सनी संघटितपणे त्या सहा-सात तरुणांना गराडा घालून त्यांना धाकात घेण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या त्या तरुणांनी हॉटेल मालकासह सगळ्या वेटर्सना मनसोक्त मारहाण केली. हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, प्लेट, चमचे, ग्लास-वाट्या यांचे नुकसानही झाले. बराच वेळ ही धुमश्चक्री सुरु होती. या दरम्यान अनेकांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, पण तो फोल ठरला.

यावेळी एका माजी नगरसेवकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. संतप्त तरुणांनी त्यालाही मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरच या प्रकरणावर पडदा पडला. या हाणामारीची संगमनेर शहरात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com