जेवण न दिल्याने एकावर जीवघेणा हल्ला

औरंगाबाद रोडवरील हॉटेलमधील घटना : तिघांविरूद्ध गुन्हा
जेवण न दिल्याने एकावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. तरीही तिघांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची मागणी केली. जेवण दिले नाही म्हणून हॉटेलमधील एकावर लाकडी दांडक्याने हल्ला करत मारहाण केली. गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल साईसेवामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अविनाश दादासाहेब जरे, युवराज भाऊसाहेब साळवे, सागर सोमनाथ टिमकरे (तिघेही रा. इमामपूर ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी संदीप मंजाबापु टिमकरे (वय 31 रा. ईमामपूर ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात हॉटेल बंदी ठेवण्याचा निर्णय झाला आहे. फिर्यादी यांनी त्यांचे हॉटेल बंद ठेवले होते.

हॉटेल बंद असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे जेवणाची मागणी केली. फिर्यादी यांनी जेवण देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी दांडक्याने पाठीवर, कमरेवर मारहाण केली.

आरोपी अविनाश जरे याने फिर्यादी यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com