दवाखान्यात कर्मचार्‍यांनी करोना बाधितांना बांधल्या राख्या
सार्वमत

दवाखान्यात कर्मचार्‍यांनी करोना बाधितांना बांधल्या राख्या

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

देशभर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण करोना महामारीत साजरे करत असतानाच करोना बाधीत रुग्ण या आनंदाच्या क्षणापासून वंचीत राहू नयेत म्हणून जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी औषधोपचार घेत असलेल्या भावांना भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधली.

तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर करोनाची भीती गायब होऊन आनंद झळकत होता. आरोळे दवाखान्यातील कर्मचार्‍यांसह करोना महामारीत आपल्या आरोग्य सेवेला वाहून घेतलेले दिसत आहे.

जगभर करोना महामारीचे थैमान चालू असताना शासकीय यंत्रणा हतबल होत आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे, कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा काळात शासनाचे हॉस्पिटल कमी पडत आहेत. 40 वर्षांपेक्षा जास्त जामखेडचा आरोळे दवाखाना आजही करोना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहे . या करोना महामारीत याठिकाणच्या मिशनरी स्पिरीटचा प्रत्यय आला आहे.

जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पात मार्च महिन्यापासून येथे 600 पेक्षा जास्त करोना क्वारंटाईन तसेच पॉझिटिव्ह रुग्ण औषधोपचार व जेवणाची व्यवस्था येथील प्रकल्पातून होत आहे.

रक्षाबंधनाच्या सणाला रुग्णांना आपण घरापासून आपल्या बहिणीपासून दूर आहोत यांचे दुःख दूर करण्यासाठी येथील महिला कर्मचारी शहाबाई कापसे, सुचिता घोरपडे, सुलताना शेख, सोनाली पवार, शबाना शेख, पायल मलेकर, अरुणा केवडे यांनी शास्त्रीय पध्दतीने पोशाख चढवून रक्षाबंधन करून करोना रुग्णांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणाचा आनंद दिला आहे.

येथे सुंदर माणुसकीचे दर्शन झाले आहे, असे येथील रुग्ण म्हणत होते. आरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा आरोळे व रवी आरोळे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खंडागळे व येथील कर्मचारी आमची प्रेमळपणे खूप चांगली देखभाल करत आहेत, असे येथील रुग्ण सांगत होते. आ रोहित पवार, तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोराडे व डॉ. युवराज खराडे हे देखील वेळोवेळी भेट देतात असेही सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com