
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कौटुंबिक वादातून तरूणाचा ऑनर किलिंग (सामूहिक खून) केल्याबद्दल रुपचंद बन्सी बळे (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा), दत्तात्रय लक्ष्मण बळे, ऋषिकेश विष्णू बळे, अनिल रघुनाथ बळे (सर्व रा. निमगाव मायंबा ता. शिरूर, जि. बीड) यांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल ढगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
अमोल सखाराम बळे (रा. सिध्दार्थनगर, नगर) यांच्याकडे 27 मे 2018 रोजी रूपचंद बळे, दत्तात्रय बळे, ऋषिकेश बळे, अनिल बळे, मयुर रावसाहब लकारे (रा. गणपती मंदिराजवळ, नेवासा) व चार अनोळखी व्यक्ती स्कार्पिओ वाहनातून आले. दत्तात्रय बळे याने अमोल याला फोन करून रूमच्या बाहेर बोलावून घेतले. अमोल रूमच्या बाहेर स्वाथ्या हॉस्पिटल येथे आला असता, त्यास आरोपींनी स्कार्पिओ वाहनात बसण्यास सांगितले. परंतु, वाहनामध्ये इतर व्यक्ती असल्याने त्याने बसण्यास नकार दिला. तेव्हा रूपचंद बळे याने बंदुकीसारखी गन अमोलच्या पोटाला लावून बळजबरीने वाहनात बसविले.
या वाहनातून अमोल यास दौंड रस्त्याने ‘बळे मासेवाला ढाब’चे पाठीमागील बाजूस आरोपी रूपचंद बळेच्या घरात घेऊन गेले. कौटुंबिक वादातून लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, चप्पल-बुटांनी बेदम मारहाण केली. त्यास दिल्लीगेट येथे आणून टाकले. त्यानंतर एका ऑटो रिक्षा चालकाने यास रूमवर आणून सोडले. त्याच्या मित्राने अमोल यास उपचाराकामी नगरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा अमोल याने त्याच्या फोनवरून छत्रपती संभाजीनगर येथील त्याचा भाऊ भाऊसाहेब तुकाराम बळे यास वरील घटनेबाबतची सर्व माहिती सांगितली. भाऊ व आई-वडील तत्काळ नगर येथे आले. त्यावेळेस अमोल याने घटनेबाबतची सविस्तर माहिती दिली. दत्तात्रय बळे याने मारहाण करताना मोबाईल काढून घेऊन त्यातील सीमकार्ड परत केल्याचे सांगितले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने दुसर्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान 6 जून 2018 रोजी रात्री साठे आठ वाजणच्या सुमारास तो मयत झाला.
मृत अमोलचा भाऊ भाऊसाहेब तुकाराम बळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रूपचंद बळे, दत्तात्रय बळे, ऋषिकेश बळे, अनिल बळे, मयुर लकारे, उषा रूपचंद बळे (कोळगाव, ता. श्रीगोंदा) व चार अनोळखींवर खून, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तपासी अधिकारी यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज व डीव्हीआर जप्त केलेला होता. सदर खटल्यामध्ये फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, पंच साक्षीदार, व तपासी अधिकारी यांच्या महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षींच्या आधारे रूपचंद बन्सी बळे, दत्तात्रय लक्ष्मण बळे, ऋषिकेश विष्णू बळे, अनिल रघुनाथ बळे यांना अपहरण आणि खुनाबद्दल दोषी धरण्यात आले. उर्वरित संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले.
रूपचंद बळे यास जन्मठेप आणि 50 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, दत्तात्रय बळे, ऋषिकेश बळे, अनिल बळे यांना जन्मठेप आणि 40 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास चार महिने साध्या कैदेची शिक्षा तसेच अपहरणाबद्दल चौघांनाही सात वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी 15 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. मृत अमोलच्या आई-वडिलांना 70 हजार रूपये दंडाच्या रक्कमेतून भरपाईपोटी देण्याचा आदेश दिला आहे. पोलीस अंमलदार कृष्णा पारखे, याकूब सय्यद यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.