हनीट्रॅप : व्यापार्‍याचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून मागितली 30 लाखांची खंडणी

सूत्रधार भाच्यासह तरूणी पोलिसांच्या ताब्यात
हनीट्रॅप : व्यापार्‍याचे अश्लिल फोटो व व्हिडीओ 
काढून मागितली 30 लाखांची खंडणी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या 21 वर्षीय तरूणीने राहुरी येथील एका 40 वर्षीय व्यापार्‍याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्याशी जवळीक साधत त्याला एका लॉजवर बोलावून प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अश्लिल फोटो व व्हिडिओ शुटींग केले. फोटोच्या आधारे व्यापार्‍यांकडून काही रक्कम वसूल केल्यानंतर 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणात व्यापार्‍याचा भाचाच सूत्रधार निघाला. त्याच्यासह तरूणीला राहुरी पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरातील एका 40 वर्षीय व्यापार्‍याला एका अनोळखी तरूणीने फोन करुन क्रेडीट कार्ड पाहिजे का, अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामवर चॅटींग सुरू झाली. सदर तरूणीने गोड बोलून त्या व्यापार्‍याकडून काही रक्कम घेतली. ती रक्कम परत घेण्यासाठी व्यापार्‍याने तरूणीला फोन केला. तेव्हा तिने शिर्डीला आल्यावर तुमचे पैसे देते, असे सांगीतले.

17 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी त्या तरूणीने व्यापार्‍याला कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापार्‍याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध दिले. नंतर व्यापार्‍याबरोबर नको त्या अवस्थेत व्हिडीओ तयार केला. तरूणीने व्यापार्‍याला लग्न कर नाहीतर 30 लाख रुपये दे. अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

दरम्यान या तरूणीने व्यापार्‍याकडून सुमारे 50 हजार रुपये वसूल केले. सदर व्यापार्‍याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुरी पोलिसांनी तपास करून या गुन्ह्याची उकल केली.

सदर गुन्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एक 21 वर्षीय तरुणी व खरा सुत्रधार व्यापार्‍याचाच भाचा असल्याचे उघड झाले. व्यापार्‍याच्या भाच्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चारुदत खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलीस नाईक कोकेकर यांच्या पथकाने काल पुणे येथून त्या तरुणीला ताब्यात घेऊन गजाआड केले.

या घटने बाबत तरुणी व व्यापार्‍याचा भाचा या दोघांवर गुन्हा रजि. नं. 12/2023 भादंवि कलम 328, 384, 385, 506 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com