वैयक्तिक दुश्मनीतून घडला हनीट्रॅप

तपासात माहिती उघड: आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
वैयक्तिक दुश्मनीतून घडला हनीट्रॅप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅप प्रकरणात आरोपी सचिन खेसे व बापू सोनवणे यांची फिर्यादीसोबत असलेली वैयक्तीक दुश्मनी काढण्यासाठी त्यांनी तरुणीला हाताला धरून हा प्रकार केला, तो त्यांच्याच अंगलट आला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याचे तपासी अधिकारी सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली. दरम्यान, आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरण उघडकीस आणल्यानंतर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी एका तरुणीसह तीचे पंटर अटकेत आहेत. त्यातील आरोपी सोनवणे व खेसे यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी सोनवणे याचे पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी असलेल्या बागतदारासोबत वैयक्तिक वाद होते. तर दुसर्‍या फिर्यादीसोबत आरोपी खेसे याचे वाद होते. या दोघांनी या तरुणीचा वापर करत संबंंधितांना अद्दल घडविण्याचे ठरविले.

या तरुणीने सुरूवातीला बागतदाराला व नंतर क्लासवन अधिकार्‍याला जाळ्यात ओढत त्यांच्यासोबत नाजूक संबंध ठेवले. या संबंधाचा व्हिडिओ काढत खंडणीची मागणी केली. वैयक्तिक वादातून हा हनीट्रॅप झाला असल्याची माहिती पोलीस देत असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून या हनीट्रॅप विषयी जिल्ह्यात चर्चा आहे. यामुळे याची व्याप्ती वाढणार असे बोलले जात असताना तपास पूर्ण झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले आहेत. अशा प्रकारची फसवणूक कोणाची झाली असेल तर त्यांनी पुढे येत फिर्याद द्यावी, आम्ही त्याचा सखोल तपास करू असेही निरीक्षक सानप यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com