
अहमदनगर (प्रतिनिधी) - क्लासवन अधिकार्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविणार्या जखणगावच्या तरूणीसह तिचा पंटर अमोल मोरे यांच्या पोलीस कोठडीत 18 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील एका बागतदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवून एक कोटीची खंडणी मागणार्या गुन्ह्यात तरूणी व अमोल मोरे अटकेत होते. त्यांना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे. दुसर्यांदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. नगर शहरातील एका क्लासवन अधिकार्याला तरूणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून जखणगाव येथील बंगल्यात बोलून घेतले होते. त्याच्यासोबत नाजूक संबध ठेवत त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते.
या व्हिडीओच्या आधारे त्या अधिकार्याकडे तरूणीसह तिच्या दोन पंटरांनी तीन कोटीची खंडणी मागितली होती. संबंधीत अधिकार्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या गुन्ह्यात तरूणीसह पाच जणांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले. यातील सचिन खेसे, महेश बागले हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून सागर खरमाळे अद्यापही पसार आहे.