
अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील बागतदारावर हनीट्रॅप करणार्या टोळीविरोधात तालुका पोलिसांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात पहिल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संबंधीत तरूणीसह तिचा पंटर अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर), बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) या तिघांविरोधात 82 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.
नगर तालुक्यातील जखणगावच्या तरूणीने एका बागतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्या बागतदाराला 26 एप्रिल रोजी घरी बोलवून त्याच्या सोबत नाजूक संबंध ठेवले. त्यावेळी तरूणीच्या साथीदारांनी व्हिडिओ चित्रिकरण केले. त्यानंतर सदर बागतदाराला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन, सोन्याच्या चार अंगठ्या, 84 हजार 300 रुपये रोख असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. तसेच त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
बागतदाराने हिमंत दाखवित सदर तरूणीसह तिच्या पंटरविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर एका क्लासवन अधिकार्यानेही हनीट्रॅप टोळीविरोधात फिर्याद दिली आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करत पोलिसांनी एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र तयार केले. शरीर सुखाचे अमिष दाखवून खंडणी मागणे, मारहाण, जबरी चोरी या कलमातंर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला आहे. यामध्ये एकुण 10 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून काहींचे 164 नुसार जबाब घेतले आहे. बुधवारी निरीक्षक सानप यांनी हे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले.