
अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका 30 वर्षीय महिलेने एका बागतदाराला नाजूक संबंधाचे आमिष दाखवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी महिलेसह तिचा साथीदार अमोल मोरे याला अटक केली होती.
या खंडणी प्रकरणात बापू सोनवणे याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी सोनवणे याला हिंगणगाव येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी सोनवणे याच्याकडून एक चारचाकी वाहन व एक मोबाईल जप्त केला आहे. सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत.