हनीट्रॅप... साहेबांचीही शिकार

आणखी एक फिर्याद दाखल होणार । आरोपींची संख्याही वाढणार
हनीट्रॅप... साहेबांचीही शिकार

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमधील तरुणीने नगर शहरातील एक क्लासवन अधिकारी अर्थात साहेबांचीही शिकार केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर येवू पाहते आहे. या प्रकरणी आणखी एक फिर्याद पोलिसांत नोंदविली जाण्याची खात्रीलायक माहिती ‘नगर टाइम्स’च्या हाती लागली.

नगर तालुक्यातील जखणगावातील तीस वर्षाय तरुणी आणि नगर शहरातील एजंट दुकानदाराच्या हनीट्रॅपचा पर्दाफाश नगर पोलिसांनी केला. त्यानंतर या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यानुसार शासकीय नोकरीतील एक क्लासवन साहेब फिर्याद देण्यास राजी झाले आहेत. त्यांची फिर्याद पोलीस नोंदवून घेणार आहे. दरम्यान या साहेबांच्या माहितीनुसार हनीट्रॅपमधील आरोपींची संख्याही वाढणार आहे. पोलिसांनी साहेबांकडून सगळी माहिती घेतली असून आरोपींचा छडा लावण्यास सुरूवातही केली आहे.

तरुणीची शिकार झालेले क्लासवन साहेब हे नगर शहरात नोकरीला असल्याचे समजते. नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार ते फिर्यादही देणार आहेत. आरोपींना ही माहिती कळाली तर ते पसार होतील, यामुळे पोलिसांनी ही बाब अत्यंत गोपनीय ठेवली आहे. नगरमधील बहुचर्चित हनीट्रॅप वृत्त प्रकरणाशी या तरुणीचा काही संबंध आहे काय? याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अ‍ॅड. सुरेश लगड यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

ऑनलाईन कॅश ट्रान्सफर!

क्लासवन अधिकार्‍यालाही प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणीने त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केले. त्यानंतर त्यांनाही ब्लॅकमेल करण्यात आले. इज्जतीला घाबरून या साहेबांनी त्या तरुणीला लाखात रक्कमही दिली. ही रक्कम देताना काही व्यवहार हे ऑनलाईनही झाले आहेत. त्याचाही पोलिस तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्यासंदर्भातील माहिती माध्यमांना देतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com