
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमधील आरोपी सचिन खेसे (रा. हमीदपूर ता. नगर) याला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, हनीट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आलेली तरुणी व तिचा एजंट मोरे यांच्या कोठडीची मुदत आज (गुरूवार) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. हनीट्रॅपच्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहे.
सुरूवातीला संबंधित तरुणी व मोरे याने नगर तालुक्यातील एका बागातदाराला या हनीट्रॅपमध्ये गुंतवले होते. यानंतर एका क्लासवन अधिकार्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकार्याने दिलेल्या फिर्यादीवरून ब्लॅकमेलर टोळीतील पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरुणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्याने कबूल केले होते.
त्यातील 80 हजार रुपये त्याने दिले होते. संबंधित तरुणीसह एजंट अमोल सुरेश मोरे, सचिन भीमराज खेसे, सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नालेगाव, नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपी खरमाळे, बागले पसार झाले आहेत. नगर तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांच्या तपासात आणखी काही व्यक्तींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींनी हिंमत दाखवत पुढे येऊन फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.