बागायतदारावर हनी ट्रॅप

एक कोटीची मागणी । नगरमधील एजंटसह महिला अटकेत
बागायतदारावर हनी ट्रॅप

अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘त्या’ प्रसंगाचा व्हिडिओ शूट केला. कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार असलेल्या एजंटामार्फत मारहाण करत बागायतदाराच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड असा 5 लाखांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणी केली. बागायतदाराने पोलिसात धाव घेतल्याने या हनी ट्रॅपचा पर्दाफाश झाला.

नगर तालुक्यातील जखणगावातील महिला व नगर शहरातील कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला बागतदार हा 58 वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. गायछाप आणण्याठी गेलेल्या बागायतदाराची ओळख तीस वर्षीय तरुणीसोबत झाली. या तरुणीने बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 26 एप्रिल रोजी त्यांच्यात शरीरसंबंध आले. त्याचवेळी नगरमधील कायनेटिक चौकातील दुकानदाराने त्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण केले. बागायतदाराला मारहाण करत त्याच्या अंगावरील 5 तोळ्याची सोन्याची चेन, साडेसहा तोळ्याच्या 4 अंगठ्या आणि 84 हजार रुपयांची रोकड असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज मारहाण करत बळजबरीने काढून घेतला.

अश्‍लील व्हिडीओ पोलिसांना दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत बागायतदाराला ब्लॅकमेल करत 1 कोटी रूपयांची मागणी केली. इतके पैसे कोठून देणार या चिंतेत असलेल्या बागायतदाराने पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. पोलिसांनी धीर दिल्यानंतर त्याने फिर्याद दिली.

एसपी मनोज पाटील, एएसपी सौरग अग्रवाल, डीवायएसपी अजित पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली. सानप यांच्या पथकाने आज सकाळीच जखणगावातील तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने कायनेटिक चौकातील किराणा दुकानदाराचाही यात सहभाग असल्याची कबुली दिली.

एपीआय सानप यांच्या पथकाने त्या किराणा दुकानदारालाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली तरुणी व किराणा दुकानदाराने जाळ्यात अडकलेल्या बागायतदाराला चाकुचा धाक दाखवून बांधले. त्यानंतर त्याला मारहाण केली, अशी माहिती एएसपी सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांना दिली. अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करावा असे आवाहन एसपी मनोज पाटील यांनी केले.

‘गाय छाप’ने गुताड्यात

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेला फिर्यादी हा नगर तालुक्यातील मोठा बागायतदार आहे. जखणगावात गाय छाप घेण्यासाठी गेलेल्या या बागायतदाराची ओळख 30 वर्षीय तरुणीसोबत झाली. त्यानंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसविले. तिच्याच घरात कायनेटिक चौकातील दुकानदाराने ‘त्या’ प्रसंगाचे व्हिडिओ शूटिंग केले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हा हनी ट्रॅप टाकला गेला.

भिंगार बँकेत गहाण ठेवलेली चेन हस्तगत

बागायतदाराच्या अंगावरून हिसकावलेली चेन तरुणीने भावाच्या नावे भिंगार अर्बन बँकेत गहाण ठेवली होती. ही चेन पोलिसांनी बँकेतून ताब्यात घेतली. तरुणीच्या घरातून सोन्याची अंगठी व 69 हजार रुपयांची रोकड तर कायनेटिक चौकातील दुकानदाराकडून 15 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com