प्रामाणिकपणा... ग्राहकाने विसरलेली ५ तोळे सोने असलेली बॅग हॉटेल व्यावसायिकाने केली परत

प्रामाणिकपणा... ग्राहकाने विसरलेली ५ तोळे सोने असलेली बॅग हॉटेल व्यावसायिकाने केली परत

नेवासा (शहर प्रतिनिधी)

करोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थिती हॉटेल व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला असल्याने हॉटेल चालक यांच्या कमाईत घट झाली आहे. तरीदेखील अशा महामारीच्या परिस्थितीत प्रामाणिकपणा हरवलेला नाही.

नगर औरंगाबाद महामार्गावरील हंडीनिमगाव येथील हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलात नजरचुकीने विसरून गेलेल्या प्रवाशी ग्राहकाचे पाच तोळे सोने व २० हजार रुपयांची बॅग त्यांचा शोध घेऊन परत केली.

याबाबत माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावरील हंडीनिमगाव शिवारातील दिलीप वाघ यांच्या हॉटेलमध्ये दि. २४ रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका बॅगेत नेकलेस, झुंबर, मिनीगंठण, गळ्यातील हार, अंगठी, मोबाईल, व वीस हजार रोख रक्कम आणि ओळखपत्र असे तब्बल ५ तोळे सोने व रोख रक्कम २० हजार एका बॅगेत मिळून आली.

सदरील बॅग बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यतील शिवनी येथील रहिवाशी बबन पंढरीनाथ राठोड व त्यांची पत्नी ज्योती यांची होती. हे दोघेही नोकरी निमित्त पुणे येथे जात असताना जेवण करण्यासाठी या हॉटेलात थांबले असता नजरचुकीने त्यांची बॅग हॉटेलमध्ये विसरली. मात्र प्रवाशांची बॅग व पैसे विसरल्याचं हॉटेल मालक दिलीप पाटील वाघ यांच्या सुदैवाने लक्षात आल्यानंतर त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनला याबाबत संपर्क करून बॅगबाबत माहिती देत असतानाच प्रवासी जोडप्याच्या बॅगेतील मोबाईल व ओळखपत्राच्या माध्यमातून संपर्क केला असता सदरील जोडपे प्रवासातून परत आले व सोनं व पैसे असलेली बॅग ताब्यात घेतली. सदरील प्रकाराबाबत हॉटेल मालक वाघ यांचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

हॉटेलमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आम्हाला देवारुपी आहे. माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं देणं लागतो. मी देखील सामान्य कुटुंबातील आहे. गरिबीची जाणीव असल्याने आज बॅग परत करून मोठे समाधान वाटले आहे.

-दिलीप वाघ, हॉटेल मालक.

खूप कष्टाने पैसे जमा करून पत्नी साठी व गुंतवणूक म्हणून सोनं केलं होतं आज हॉटेल मालक दिलीप पाटील वाघ यांचा प्रामाणिकपणा पाहून जगात देव माणसांची कमी नसल्याची जाणीव झाली.

-बबन राठोड, प्रवाशी

Related Stories

No stories found.