’त्या’ निराधार महिलेसह तिच्या सहा मुलांना मिळाला आश्रय

’त्या’ निराधार महिलेसह तिच्या सहा मुलांना मिळाला आश्रय

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील साईआश्रया या निराधार आश्रमात काल शिर्डीत भीक मागून आपली 6 मुलांना घेवून गुजराण करत होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात ही निराधार महिला व तिची सहा लेकरं उपाशी राहू लागली. मात्र शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेत या निराधार महिला व तिच्या मुलांना साईआश्रया आश्रमात दाखल केले. यामुळे या महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रु ओसंडून वाहत होते.

एक निराधार महिला वैशू लाला लांडे (वय - 36) हिचा पती आजारपणाच मयत झाला. शिर्डी साई नगर रेल्वे स्टेशन परिसरातील काट्यांच्या कुंपणात आपली 6 लेकरे घेऊन राहत होती. त्यामध्ये 3 महिन्याची मुलगी, 2 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी, 6 वर्षाचा मुलगी, 7 वर्षाची मुलगी, असे एकूण सहा लेकरं घेऊन ती राहत होती. दोनवेळचे जेवण मिळावे यासाठी तिच्या दोन मुली शिर्डी मंदिर परिसरात भिक्षा मागण्यासाठी जात होत्या.

कधीकधी साई भोजनालय येथे जाऊन आपली भूक भागवत होत्या. परंतु लॉकडाऊन झाल्याने अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही निराधार महिला तिची लेकरे उपाशी राहू लागली. त्यात एका मुलीचा एक डोळा अपघातात निकामी झाल्याने ती एका डोळ्याने अंध झाली. कुठल्याही प्रकारचा उपचार तिने घेतला नाही. अशा परिस्थितीत या महिलेला आपण या लेकरांना घेऊन जगावे की मरावे हा मोठा प्रश्न उभा राहिला.

त्यांच्याविषयी साई सेवक गणेश दळवी यांना कळाले व शिर्डी पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला. शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, त्याचबरोबर पोलीस प्रवीण दातरे यांनी स्वतः लक्ष घालून या महिलेला या कठीण काळाबद्दल समुपदेशन केले. मातेसह या लेकरांना साई आश्रयात दाखल करण्याचे नियोजन केले.

श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या साईआश्रयाचे ठिकाणी साईआश्रय देण्याचे ठरवले या मुलांना चांगले आरोग्य, शिक्षण व हक्काचे घर देण्याचे ठरविले. तेव्हा कायदेशीर पूर्तता करून मातेला व लेकरांना साई आश्रयात दाखल करण्यात आले. दोन वेळचे भोजन, राहण्यासाठी निवारा तसेच या मुलांना चांगले शिक्षण मिळणार असे साईआश्रयात आल्यानंतर या महिलेला विश्वास आला. तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com