घर तेथे शोषखड्डा; भेंडा बुद्रुक ग्रामसभेचा निर्णय

घर तेथे शोषखड्डा; भेंडा बुद्रुक ग्रामसभेचा निर्णय
File Photo

भेंडा |वार्ताहर| Bhenda

सांडपाणी व्यवस्थापन व जल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घर तेथे शोषखड्डा उपक्रम राबविण्याचा निर्णय भेंडा बुद्रुक ग्रामसभेने घेतला आहे.

नेवासा तालुक्यातील निर्मल ग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीची ग्रामसभा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, सरपंच वैशाली शिवाजीराव शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत झाली.

ग्रामसभेत झालेल्या चर्चेत जलमित्र सुखदेव फुलारी यांनी गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या सोडविण्यासाठी व जल पुनर्भरणाला हातभार लावण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या कामाअंतर्गत ‘घर तेथे शोषखड्डा’ घेण्यात यावा अशी सूचना मांडली. सचिन तागड यांनी व्यायामाचे साहित्य व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा गावकर्‍यांना लाभ मिळावा, कारखाना कर वाढवून मिळावा याबद्दल सूचना केल्या. अमोल जोगदंड यांनी प्रभागातील रस्ते तयार करताना प्रथम सोलिंग करून किंवा मुरूम भरून त्याची उंची वाढवावी अशी सूचना केली.

नळ जोड व पाणीपुरवठा, ग्राम निधी जमा-खर्च वाचन, व्यवसाय करात वाढ करणे, 21 लाख रुपये थकीत घरपट्टी व 27 लाख रुपये थकबाकी पाणीपट्टी वसुली करणे, म. गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना वैयक्तीक व सार्वजनिक लाभाची कामे, योजना, कारखाना कर, ठोक अंशदान वाढून घेणे, विधी शिबिर घेणे, ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रेशन कार्ड या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे, अशोकराव मिसाळ, गणेशराव गव्हाणे, शिवाजीराव तागड, अंबादास गोंडे, ग्रामपंचायत सदस्या संगीता गव्हाणे, लता सोनवणे, उषा मिसाळ, सुहासिनी मिसाळ, मंगल गोर्डे, नामदेव निकम, बलभीम फुलारी, कादर सय्यद, अण्णासाहेब गव्हाणे, देविदास गव्हाणे, पंढरीनाथ फुलारी, देवेंद्र काळे, नामदेव शिंदे, बाळासाहेब वाघडकर, राजू चिंधे, किसन यादव, कृष्णा गव्हाणे, शिवाजी फुलारी, किशोर मिसाळ, दिलीप गोर्डे, सचिन तागड, सुहास वेताळ, अमोल जोगदंड, कृष्णा गव्हाणे, यडूभाऊ सोनवणे, मुख्याध्यापक माणिक जगताप, मुख्याध्यापक शकील शेख, मुख्याध्यापक प्रदीप चक्रणारायण, मुख्याध्यापक सुनील गायकवाड, ग्रामसेवक रेवणनाथ भिसे, बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी आदी यावेळी उपस्थित होते. नामदेव निकम यांनी आभार मानले.

रुग्णालयाला लोकनेते घुले पाटलांचे नाव देण्याचा ठराव...

भेंडा गावासाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर करून निधी दिल्याबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे तसेच या रुग्णालयासाठी जमीन दिल्याबद्दल कडूभाऊ काळे यांच्या आभाराचा व अभिनंदनाचा ठराव ग्रामपंचायत सदस्या संगीता गव्हाणे यांनी मांडला. तर या रुग्णालयाला लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सचिन तागड यांनी मांडला. हे दोनही ठराव ग्रामसभेने मंजूर केले.

Related Stories

No stories found.