
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुलाला मारहाण होत असल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या होमगार्ड अधिकार्यावर तिघांनी लाकडी दांडके, दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात होमगार्ड अधिकारी जखमी झाले आहेत. रावसाहेब जगन्नाथ आव्हाड (वय 45 रा. गाडेकर चौक, सावेडी) असे जखमी अधिकार्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दीपक तांदळे, अशोक गिते, गणेश कांबळे (सर्व रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रावसाहेब आव्हाड यांना मुलाने फोनवरून सांगितले की, काही कारण नसताना दारू पिऊन मुले शिवीगाळ, मारहाण करत आहे.
फोन आल्याने रावसाहेब आव्हाड घटनास्थळी गेले. तेथे तिघे मुलगा महेशला मारहाण करत असल्याने दिसताच रावसाहेब यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलांनी रावासाहेब यांना लाकडी दांडके, दगडाने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.