अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
हिंदू धर्मियांचा महत्वाचा असणार्या दिवाळी सणातील लक्ष्मी पुजनाच्या कार्यक्रमासाठी शनिवारी सहापासून मुहूर्त होता.
या मुहूर्तावर घरोघरी या मोठ्या भक्तीभावात लक्ष्मी पुजनाचा विधी पार पडला. लक्ष्मी पुजनाच्या कार्यक्रमाने दिवाळी सण साजरा करण्यात आला.
दु:ख, दैन्याचा नाश करत मनामनांत सुख, शांती, समृद्धीचा दीप उजळणारा प्रकाशपर्व अर्थात दीपावलीला शुक्रवारपासून सुरूवात झाली होती. इतर सणांप्रमाणे दिवाळी सणावरही करोनाची छाया असली, तरी आशेची मंद का होईना एक पणती प्रत्येकाच्या मनात तेवत असल्याने नगरकरांनी दिवाळी सणाच्या एक-दोन दिवस आधी विविध खरेदीचा आनंद लुटत सण साजरा केला.
या प्रकाशपर्व दीपावलीनिमित्त कपडे, मिठाई, रांगोळी, पुजेचे साहित्य, सोन्याचे दागिने, आकाश कंदील, फटाके, सजावटीचे साहित्य, रोषणाईचे इलेक्ट्रिक दिवे, फळे, घरगुती वापराच्या वस्तू, घरगुती साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यासह पुजेचे साहित्य आणि प्रामुख्याने झेंडू, शेवंती आणि अन्य फुलांचे बाजारही काल तेजीत होते.
सायंकाळी पावणे सहापासून लक्ष्मी पुजनाचे रात्री उशीरापर्यंत तीन ते चार मुहूर्त होते. या मुहूर्तावर घरोघरी मोठ्या भक्तीभावात लक्ष्मी पुजनाचा कार्यक्रम झाला.