पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेला रविवारी (दि. 28) औपचारिकपणे प्रांरभ झाला. कझराच्या पार्श्वभूमीवर शासनाने यात्रेला बंदी घातल्याने

फक्त मानकरी व विश्वस्तांच्या उपस्थितीत आवश्यक विधी पार पडले. सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लागली तर सायंकाळी होळीच्या मानाच्या गोवर्या गोपाळ समाजातील मानकर्यांना मान देत मानाची होळी पेटली.

मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी असून होळीपासून गुढी पाडव्यापर्यंत यात्रा चालते. राज्यासह शेजारील राज्यातूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात.गाढवांचा बाजार, प्राण्यांच्या केसांचा व्यापार, भटक्या समाजातील व विविध जातीचे मेळावे, आयुर्वेदातील वनस्पतीचा व्यापार ग्रामीण शेतकी औजारांची विक्री मिठाई व फरसाण विक्रीचा उच्चांक या यात्रेत होता.

भटक्या समाजाची पंढरी म्हणून मढी यात्रेकडे पाहिले जाते. करोना साथरोगामुळे यंदा यात्रेच्या मुख्य दिवशी जमावबंदीचे आदेश शासनाने जारी करून फक्त मानकरी व देवस्थान समितीच्या विश्वस्तांना आवश्यक विधी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एरव्ही डफांच्या तालावर डोलणारी पंचकृषी यंदा यात्रा असूनही सूनीसुनी वाटत आहे.

यात्रा बंदीचे सलग दुसरे वर्ष आहे.कानिफनाथांचा गड बांधण्यासाठी कैकाडी समाजाचे योगदान व निष्ठा पाहून या समाजाला मानाची पहिली काठी कळसाला लावण्याचा मान देण्यात येऊन होळीच्या दिवशी सकाळी मिरवणुकीने काठी आणून कळसाला लागताच नाथांचा एकच जयजयकार होऊन यात्रा सुरू झाल्याचे समजले जाते. रेवड्या उधळून भाविक आनंद व्यक्त करतात सायंकाळी सूर्यस्ताच्या वेळी राज्यातील समाजाचा मानकर्या यांना देवस्थान समितीतर्फे मानाच्या गोवर्या दिल्या जातात. समाजाचे मानकरी या गोवर्या डोक्यावर मिरवत गडाच्या पायथ्याला दत्त मंदिराजवळ जमून होळी पेटवतात. मढीचे ग्रामस्थ सामूहिक होळी गावात पेटवत नाही.

यंदा मानाच्या होळीसाठी गोपाळ बांधवासह अन्य भाविकांना प्रतिबंध करण्यात आल्याने फक्त मानकरी मढीत दाखल झाले. महसूल व पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात होता. सायंकाळी चार वाजल्यानंतर गोपाळ समाजातील मानकर्यांना देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड व कोषाध्यक्ष बबन मरकड यांनी मानाच्या गोळ्या दिल्या.वाजत गाजत दत्त मंदिराच्या बाजूला मानकर्यांनी होळी पेटवली.

समाजातील वादामुळे मागील वर्षी दोन होळ्या पेटवल्या होत्या. नव्या जागेवर होळी पेटवून द्यावी, असा आग्रह मानकर्यांनी धरल्याने प्रशासन व गोपाळ बांधवांमध्ये काही काळ तणाव वाढला. पारंपारिक जागेवर होळी पेटवण्यास प्रशासन ठाम राहिले त्यामुळे जुन्या जागेवर होळी पेटली.

तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यासह 40 पोलीस, 30 गृहरक्षक दलाचे जवान असा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यात्रेचा दुसरा टप्पा रंगपंचमीचा असून चतुर्थी पंचमी षष्ठीला मंदिर बंद राहून गावात जमावबंदी आदेश राहणार आहे. बाहेरच्या कुणीही भाविक व व्यावसायिकाने यात्रेसाठी मढीला येऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, शामराव मरकड, डॉ. विलास मरकड, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड आदींनी कैकाडी व गोपाळ समाजातील मानकर्यांचा सन्मान केला. गोपाळ बांधवांना मढीच्या होळीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून सकाळी लवकर मढीला येत नाथांच्या समाधीचे दर्शन घेत पारंपरिक विधी पार पाडले.