हिवरगावपावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपोषण सुरू

हिवरगावपावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपोषण सुरू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नजीकच्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आत्तापर्यंत अनेक अपघात झाले. यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांचा मृत्यू झाला तरी टोल प्रशासन आपल्या कारभारात सुधारणा करावयास तयार नाही. टोल वसुलीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या टोल प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष कपील पवार यांच्या नेतृत्वाखाली कालपासून अमरण उपोषण सुरू केले आहे.

टोल प्रशासनाच्या विरोधात आत्तापर्यंत सर्वच पक्षांनी आंदोलने केली, मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याशिवाय ठोस अशी कोणतीही कृती टोल प्रशासनाने केलेली नाही. स्थानिक नागरिकांनादेखील टोल वसुलीचा फटका बसत असताना या टोल प्रशासनावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कोणते झारीतील शुक्राचार्य पाठीशी घालत आहेत याचादेखील उलगडा होताना दिसत नाही. टोल प्रशासनाला नेमके कोणाचे आशिर्वाद आहेत, त्यामुळे त्यांच्या कारभारात सुधारणा होत नाही.

वारंवार सूचना देऊन, आंदोलनाचे इशारे देऊन देखील महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे बुजविले जात नाही. सर्व्हिस रोडची कामे केली जात नाहीत. दिशादर्शक गावांचे फलक लावले जात नाहीत. टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांच्या दादागिरीला आळा घातला जात नाही. आदी कारणामुळे या टोल नाक्यावर वारंवार वाद होताना दिसतात. अनेक कामे पूर्ण झालेली नसताना, अनेक कामे अपूर्ण कामांकडे लक्ष दिले जात नसताना देखील येथे टोल वसुली जोरात सुरू आहे.

या मार्गावर झालेल्या अपघातास, त्यात झालेल्या अनेकांच्या मृत्यूस, त्यांना गंभीर इजा पोहोचविण्यात, कायमचे अपंगत्व आणण्यात, वाहनांच्या नुकसानीस टोल प्रशासनच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यास प्रशासन तयार नाही. अपघातात मृत्यू आल्याने अनेक घरांतील कर्ते पुरुष गमवावे लागले असल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीस जबाबदार असलेल्या टोल प्रशासन, पेट्रोलिंग व्यवस्थापन आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी जिल्हा युवक काँग्रेसने ही सर्व कामे पुर्णत्वास जाईपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे.

यावेळी अक्षय भालेराव, राहुल वर्पे, अमोल राऊत, नितीन आहिरे, गजानन भोसले, किरण घोटेकर, प्रसाद काळे, अशोक काळे, तुषार वाळे, विकी पवार, शशिकांत पवार, गणेश गुंजाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com