हिवरगावपावसा टोल नाक्यावर आम्ही संगमनेरकरांचे आंदोलन

स्थानिकांना टोलमाफी द्यावी, मागणीचे टोलनाका प्रशासनाचे अधिकारी राणा यांना दिले निवेदन
हिवरगावपावसा टोल नाक्यावर आम्ही संगमनेरकरांचे आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगावपावसा टोल नाक्यावर स्थानिक वाहन धारकांना टोल माफी द्यावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, महामार्गावरील लाईट चालू कराव्यात, सर्व्हिस रस्त्यांची कामे पूर्ण करावीत आदी मागण्यांसाठी आम्ही संगमनेरकरांनी काल टोलनाक्यावर आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

युवा कार्यकर्ते अमोल खताळ, जनार्दन आहेर, अमर कतारी, संदीप राहाणे, रामभाऊ राहाणे यांनी टोल प्रशासनाला जाब विचारला. टोलनाका प्रशासनाचे अधिकारी श्री. राणा यांना समर्पक उत्तरे न देता आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंदोलनकर्त्यांनी राणा यांना चांगलेच धारेवर धरले.

या महामार्गात स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. टोल सुरू करण्यावेळी स्थानिकांकडून टोल वसुली करणार नाही, असे आश्वासन टोल प्राधिकरणाने दिले होते. मात्र फास्ट टॅग आल्यानंतर आपोआप स्थानिक नागरिकांच्या खात्यातून पैसे कट होऊ लागले. याबाबत अमोल खताळ, अमर कतारी यांनी टोल प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे.

टोल नाका प्रशासनाविरुद्ध यापूर्वीही अनेकदा आंदोलने झाली आहेत. स्थानिक नागरिकांना टोल आकारू नये यासाठी झालेल्या आंदोलनावेळीही टोल प्रशासनाने आश्वासन दिले होते. काही दिवस अंमलबजावणी झाली मात्र त्यानंतर टोल वसुली पुन्हा सुरू झाली. आता फास्ट टॅग सुरू झाले. तशी वाहनधारकांकडून टोल वसुली सुरू झाली आहे. स्थानिकांकडून आधार कार्ड घेतले जाते. टोल घेतला जाणार नाही, असेही सांगण्यात येते. मात्र दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी वाहनधारकांच्या खात्यातून पैसे कट होतातच.

याबाबत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी टोल प्रशासनाला निवेदने दिली. बैठकाही झाल्या. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. टोल प्रशासनाने हुकूमशाही पद्धतीने टोल वसुली सुरुच ठेवली. त्याविरोधात आम्ही संगमनेरकर एकत्र झाले. टोल नाका प्रशासनाकडून मागण्यांवर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. टोल नाका प्रशासनाची मनमानी येथून पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही, महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी टोल कंपनीने ज्या काही सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते त्या सर्व सुविधा या स्थानिकांसह इतर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही दिल्या जाव्यात, संगमनेरकरांसाठी स्वतंत्र लेन करा, अशीही मागणी स्थानिकांची असल्याचे अमोल खताळ यांनी सांगितले.

टोल नाक्यावर कर्मचारी हिंदी भाषिक ऐवजी मराठी भाषिक कर्मचार्‍यांची नेमणूक करावी, स्थानिकांकडून टोल वसुली करू नका, स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली.

टोल नाका प्रशासन कुणाच्या नेतृत्वाखाली काम करते, स्थानिकांची अडवणूक होते. संगमनेरच्या नागरिकांची अडवणूक येथून पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही. शेतकर्‍यांच्या मुलांना या टोल नाक्यावर मारहाण झाली, मात्र आता जर पुढील काळात मारहाण झाली तर टोल नाका कर्मचार्‍यांना देखील जशास तसे उत्तर दिले जाईल, असा गंभीर इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी दिला.

चंदनापुरीचा फ्लाय ओव्हर झालेला नाही, सर्व्हिस रोड व्यवस्थित नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. महामार्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टोल नाका प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे नागरिकांचे जीव गेले. याला जबाबदार म्हणून टोल नाका प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संदीप राहाणे यांनी केली.

यापुढे स्थानिक वाहनधारकांकडून टोल वसुली करणार नाही, रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण करू, असे आश्वासन प्राधिकरण अधिकारी श्री. राणा यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शरीफ शेख, दीपक साळुंखे, भाजप किसान मोर्चाचे सतीश कानवडे, अविनाश थोरात, पप्पू कानकाटे, अमित चव्हाण, रंगनाथ फटांगरे, रमेश काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल वर्पे, तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, अमोल राऊत, भाजपाचे काशिनाथ पावसे, शिवसेनेचे गुलाब भोसले, नारायण खुळे, अक्षय थोरात, अण्णासाहेब काळे, निलीमा घाडगे, शितलताई हासे, सदाशिव हासे, योगेश सूर्यवंशी, दत्तू नाईक, नानासाहेब पर्बत, प्रसाद सुतार, रामनाथ अभंग, शाम राहाणे, विलास डमाळे, मंजित गायकवाड, विजय आढाव, योगेश बिचकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनावेळी संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com