हिवरे बाजार ग्रामविकासात देशाला प्रेरणा देणारे गाव

पालकमंत्री मुश्रीफ : शिवारफेरीसह गावातील विकासाची केली पाहणी
हिवरे बाजार ग्रामविकासात देशाला प्रेरणा देणारे गाव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आदर्श गाव हिवरे बाजार देशाला ग्रामविकासाची दिशा देणारे गाव आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी हिवरे बाजार भेटीत काढले. यावेळी त्यांच्यासमवेत कर्जत-जामखेडचे आ. रोहीत पवार उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी गेल्या 30 वर्षांत हिवरे बाजारमध्ये झालेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पोपटराव पवार यांच्याशी चर्चा केली.

मुश्रीफ यांच्याहस्ते कृषी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जलपूजनही करण्यात आले. सध्या हिवरे बाजारमध्ये भारतीय संविधानाचे पारायण (वाचन) चालू आहे. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी संविधानाचे वाचन करून हिवरे बाजारच्या अभियानात सहभाग घेतला. संपूर्ण शिवार पाहणीनंतर हिवरे बाजार ग्रामपंचायतच्या माध्यमातून व लोकसहभागातून शासनाच्या विविध योजनांचे प्रभावीपणे नियोजन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

म्हणूनच आज हे गाव सर्वार्थाने स्वयंपूर्ण आदर्श गाव आहे. या पद्धतीने प्रत्येक गावाने गरजा ओळखून शासकीय योजनांचा व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सुधारणेसाठी नवीन समिती करून ग्रामविकासाबाबत काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.त्यासाठी काही धोरणे बदलावी लागली तरी चालेल, असे मुश्रीफ म्हणाले.

यावेळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, तहसीलदार नगर उमेश पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत व इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com