
अकोले |प्रतिनिधी| Akole
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांमध्ये आदिवासी विकास महामंडळामार्फत तात्काळ हिरडा खरेदी केंद्रे सुरु करावेत व मागील वर्षी भात खरेदी केल्याचा बोनस मिळावा अशी मागणी भाजप जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री व माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे.
याबाबत आदिवासी विकास मंत्री ना. के. सी. पाडवी, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ जुन्नर कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या राजूर येथील उपव्यवस्थापकीय उपप्रादेशिक कार्यालयात त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की, अकोले हा तालुका आदिवासी, दुर्गम व डोंगराळ आहे. तालुक्यामध्ये हिरड्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून यापूर्वी आपल्या आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी केला जात होता. हिरडा खरेदी केंद्रे हे मार्च/एप्रिल महिन्यातच सुरु होत होते. परंतु यावर्षी अद्यापपर्यंत हिरडा खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. सध्या जुन महिन्याला सुरुवात होत आहे.
आदिवासी शेतकर्यांनी वाळून ठेवलेला हिरडा जर वेळेत विकला गेला नाही तर शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हिरडा विकला गेलाच नाही तर अनेक शेतकरी खरीप हंगामाचे बी-बियाणे, खते खरेदी करु शकत नाही. अकोले व जुन्नर या तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी तात्काळ हिरडा खरेंद्री केंद्रे सुरु करावेत. मागील वर्षी भात खरेदीचा बोनस मिळावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.