खंडणी
खंडणी
सार्वमत

हिंदुराष्ट्र सेनेचा पदाधिकारी खंडणी घेताना अटक

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरातील हॉटेल व्यवसायिकाकडून तीन लाखांची खंडणी मागत एक लाख रुपये स्वीकारत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंदूराष्ट्र सेनेचा पदाधिकारी दिगंबर गेंट्याल याला सोमवारी (दि. 29) सायंकाळी अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारू विक्रीस परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना दारू विक्रीचा परवाना मिळाल्याने त्यांनी हॉटेल चालू केले होते. दिगंबर लक्ष्मण गेंट्याल याने या परवान्याबाबत माहिती अधिकारांतर्गत उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राच्या आधारे परवाना दिला, याची माहिती मागवून घेतली होती.

या माहितीच्या आधारे गेंट्याल तक्रारदारांना उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी करून हॉटेल परवाना रद्द करतो, अशी धमकी देत होता. त्यासाठी तक्रारदारास वारंवार फोन करून, समक्ष भेटून तीन लाखांची खंडणी मागत होता.

हॉटेल व्यावसायिकाने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार वर्ग करून कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिशीरकुमार देशमुख, समाधान सोळुंके, सूरज मेढे, पोलीस हवालदार रवींद्र पांडे, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, पोलीस शिपाई संदीप दरंदले, कमलेश पाथरूट, रोहित मिसाळ यांच्या पथकाने माळीवाडा परिसरात सापळा रचला. तक्रारदारास एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी गेंट्याल याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेण्यास सांगितले. गेंट्याल पैसे घेण्यास आला त्या वेळी पोलीस पथकाने त्याला अटक केली.

हिंदुराष्ट्र सेनेचा पदाधिकारी असलेल्या दिगंबर गेंट्याल विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. हत्येचा प्रयत्न, दरोडा, सरकारी कामात अडथळा, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट, डिफेन्समेंट अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम कोणत्याही कारणासाठी खंडणी, वर्गणी मागत असतील किंवा इतर प्रकारचा त्रास देत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com