हिंद सेवा मंडळाच्या शाळा चेअरमन निवडी जाहीर

भुतडा, छल्लारे, कुंकूलोळ, नगरकर, गांधी व सगम यांची वर्णी तर उपाध्येंना मुदतवाढ
हिंद सेवा मंडळाच्या शाळा चेअरमन निवडी जाहीर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

हिंद सेवा मंडळाच्या श्रीरामपूर शहरातील शाळांच्या चेअरमनपदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात शशिकांत भुतडा, संजय छल्लारे, भरत कुंकूलोळ, विजय नगरकर, सुशिल गांधी व चंद्रकांत सगम यांची चेअरमनपदावर वर्णी लावण्यात आली असून अशोक उपाध्ये यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी दिली.

हिंद सेवा मंडळाच्या नगर येथे झालेल्या बैठकीत श्रीरामपूर येथील शालेय चेअरमनपदाच्या निवडीचे अधिकार मानद सचिव संजय जोशी यांना देण्यात आले होते. त्यानुसार काल सकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. या बैठकीसाठी अनिल देशपांडे, दत्तात्रय साबळे, रणजीत श्रीगोड, अशोक उपाध्ये, जितेंद्र अग्रवाल, ऋषीकेश राजेंद्र जोशी, अनिल भनगडे, सचिन मुळे, अधिक जोशी, कल्याण लकडे, सतीश म्हसे, श्री. भागरे, सौ. वाबळे, श्री. कांबळे आदी उपस्थित होते.

हिंद सेवा मंडळाच्या श्रीरामपूर शहरातील दादा वामन जोशी कलामंदिरच्या चेअरमनपदी शशिकांत भुतडा, क. जे. सौमय्या हायस्कूलच्या चेअरमनपदी संजय छल्लारे, शां. ज. पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी भरत कुंकूलोळ, क. जे. सौमय्या ज्युनियर कॉलेजच्या चेअरमनपदी विजय नगरकर, दादा वा. जोशी बालवाडी विभागाच्या चेअरमनपदी सुशिल गांधी तर डॉ. कल्याणकर रात्र प्रशाळेच्या चेअरमनपदी चंद्रकांत सगम यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. तर भि. रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन पदी माजी नगरसेवक दत्तात्रय साबळे यांची वर्णी लागली होती.

मात्र विद्यमान चेअरमन अशोक उपाध्ये यांनी मुलीचे लग्न आहे तोपर्यंत मलाच चेअरमन म्हणून संधी द्या, असा आग्रह धरल्याने त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. सहा महिन्यानंतर भि. रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन म्हणून दत्तात्रय साबळे यांना संधी दिली जाणार आहे. तसेच भि. रा. खटोड कन्या ज्युनियर कॉलेजच्या चेअरमनपदासाठी नवीन चेहरा निवडण्यात येणार असल्याचेही संजय जोशी यांनी सांगितले.

यावेळी संचालक म्हणून निवडून आलेल्यांऐवजी अन्य सभासदांना संधी देण्यात आली आहे. सध्या मराठी शाळांना चांगले दिवस आले असून ते टिकविण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागणार असल्याचेही श्री. जोशी यांनी सांगितले.

सदरच्या निवडी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक हेरंब आवटी, ब्रिजलाल सारडा यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com