महामार्ग प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून खुर्चीला हार घालत निषेध
महामार्ग प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कल्याण - निर्मल ( विशाखापट्टणम ) या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गेले होते. मात्र त्यांना महामार्ग अभियंता कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळल्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी उप अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. तसेच या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अविनाश टकले, नागनाथ गर्जे, सोमनाथ बोरुडे,अरविंद सोनटक्के आदी उपस्थित होते. जोपर्यंत या रस्त्याच्या ठोस निर्णय लागत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसान आव्हाड यांनी घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 61 चे फुंदे टाकळी फाटा ते मेहकरी फाटा बंद पडलेले काम त्वरीत सुरू करून पूर्ण करावे, रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने बुजवून झालेल्या निकृष्ट कामाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक किसन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात 20 एप्रिल रोजी बैठा सत्याग्रह करून उपोषण आंदोलन केले होतेे.वीस दिवस होऊन गेले तरी देखील यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून कल्याण निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी चालू तर कधी बंद अशी अवस्था आहे. रेंगाळलेल्या कामामुळे आजपर्यंत निष्पाप शेकडो लोकांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या मार्गावर दुचाकीवरून पडून मोठ्या प्रमाणावर लोक आज पर्यंत जखमी होऊन अपंगत्व आले आहे.मात्र या अधिकार्‍यांनी आंदोलनाला न जुमानता सातत्याने या महामार्गाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी 2 मे रोजी महामार्गाच्या अधिकार्‍यांना लेखी स्वरूपात पत्र दिले होते. मात्र आंदोलन होणार म्हणून बेजबाबदार अधिकारी मात्र आलेच नाही,आंदोलकांनी कार्यालयातील अधिकार्‍याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू करुन बैठा सत्याग्रह चालू केला आहे. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी सांगितले.

गडकरींचे वेधणार लक्ष

येत्या 31 मे रोजी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचा शेवगाव -पाथर्डी मतदार संघात दौरा आहे.त्यावेळी त्यांना या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांबाबत निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधणार आहे. तर खासदार आणि आमदार हे तालुक्यात आल्यावर त्यांना रस्त्याच्या कामा बाबतच्या दिरंगाईला जाब विचारून काळे झेंडे दाखवणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com