महामार्ग भूसंपादनाची शेतकर्‍यांच्या रक्कम खात्यावर वर्ग

चार वर्षांपासून रखडलेल्या कामास मिळणार गती
महामार्ग भूसंपादनाची शेतकर्‍यांच्या रक्कम खात्यावर वर्ग
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातून जाणार्‍या कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादित केलेल्या शेतकर्‍यांना ऑनलाईन रक्कमेचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांनी केले. यामुळे तातडीने भुसंपादनाची प्रक्रिया पुर्ण होऊन जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग येणार आहे. चार वर्षापासून रखडलेले काम लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांच्या दालनात 19 मे रोजी महामार्गासाठी भुसंपादन करण्यात आलेल्या ज्या शेतकर्‍यांच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे, आशा शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर भुमिराशी पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने भूसंपादनाचा मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

यावेळी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अभय राखाडे, नायब तहसिलदार आर. एम. ससाणे, अव्वल कारकून नितीन बनसोडे, संगणक सहाय्यक अविनाश काळोखे आदीसह शेतकरी यावेळी उपस्थित होते. या भूसंपादन प्रक्रियेतील संबंधित शेतकर्‍यांना रक्कम दिल्याने तातडीने भूसंपादन करून जमिनी ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे भूसंपादनामुळे रखडलेले रस्त्याचे काम वेगाने चालू होईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय राखाडे यांनी व्यक्त केली.

सव्वाचार कोटींचे होणार वाटप

महामार्गावरील 28 गटातील शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यात येणार असून त्यापैकी 7 गटातील शेतकर्‍यांना भूसंपादनाची रक्कम यावेळी देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 4 कोटी 26 लाख 52 हजार 618 रुपये या रक्कमेपैकी पैकी 95 लाख 63 हजार 772 रुपये रक्कम वाटप करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com