उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील शाळांची तपासणी

जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील शाळांची तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आदेश दिल्याने जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात येत आहे. खंडपीठाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी सांगितले.

शाळांची तपासणी करण्यासाठी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे तर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हाधिकारी (महसूल), पोलीस उपअधीक्षक हे सदस्य म्हणून काम करत आहेत. नुकतीच जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न होऊन शाळांना भेटी देत तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे, खासगी व्यवस्थापनाकडून पाच हजार 240 शाळा चालविल्या जातात.

या शाळांतून सुमारे नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तपासणीमध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांची स्थिती, शालेय परिसर स्वच्छता, मुला- मुलींचे स्वच्छतागृहे व त्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळेला होणारा उपद्रवी घटकांचा त्रास, शाळा परिसरातील अवैध व्यवसाय, तंबाखूमुक्त शाळा, शालेय इमारती व परिसराचा फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग होतो किंवा नाही यासह इतर अनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत.

दरम्यान, जिल्हास्तरीय समितीने नगर तालुक्यातील अकोळनेर, मेहेत्रे वस्ती, सारोळा कासार व घोसपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, उपजिल्हाधिकारी (महसूल) वैशाली आव्हाड, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांच्या पथकाने नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com