हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणार्‍या दोघांना न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसर्‍या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (शुक्रवार) संपणार असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. 7) दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीत रॉडने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अक्षय विष्णू सब्बन (रा. दातरंगे मळा) व चैतन्य सुनील सुडके (रा. बालिकाश्रम रस्ता) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरूवारी (दि. 12) संपल्याने त्यांना तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांनी न्यायालयासमोर हजर केले होते. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घ्यायचा असल्याने वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर येत असून पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करत आहेत.

पसार असलेल्या सनी ज्ञानेश्वर जगधने (रा. सर्जेपुरा) व अक्षय कैलास माळी (रा. कोठला) यांना बुधवारी (दि. 11) अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या कोठडीची मुदत आज (शुक्रवार) संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com