मेली म्हणून टाकून दिली, ‘ती’ पुन्हा मालकीणीच्या दारात हजर झाली

मजेशीर घटनेची जोरदार चर्चा
मेली म्हणून टाकून दिली, ‘ती’ पुन्हा मालकीणीच्या दारात हजर झाली

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri Factory

‘मारनेवाला है भगवान, बचानेवाला है भगवान’ हे आपण नेहमी ऐकतो किंवा बोलतो. मात्र, या गोष्टीचा प्रत्यक्षात अनुभव देवळाली प्रवरा येथे इस्लामपुरा परिसरात आला. घडलेल्या या मजेशीर घटनेची जोरदार चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.

ग्रामीण भागात विशेषतः शेतामध्ये राहणार्‍या अनेक महिला आपल्या हाती दोन पैसे राहावेत, या आशेने कोंबडी पालन करतात. देवळाली प्रवरा इस्लामपुरा परिसरात राहणार्‍या रेहाना भाभी याही दिवसभर मोलमजुरी करतात. त्या जोडीला पाच दहा कोंबड्यांचे पालन करतात. चार दिवसांपूर्वी संध्याकाळचे वेळेस नुकत्याच पंधरा वीस पिलांना महिन्यापूर्वी जन्म दिलेली एक कोंबडी अचानकपणे फडफड करत जीव सोडीत असल्याचे लक्षात आले.

तिला पाणी पाजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने जीव सोडला. हे लक्षात आल्याने रेहाना भाभीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. नुकसान तर झालेच वरून तिच्या लहान पिलांचे काय होणार? या जाणिवेने तिचा जीव कासावीस झाला. नातवाला सांगून जड अंतःकरणाने ती कोंबडी जवळच असणार्‍या विहिरीच्या कडेला नेऊन टाकली.

त्या कोंबडीकडे दोन दिवस कोणी फिरकल नाही. सकाळी अंगणाची झाडलोट करताना दोन दिवसापूर्वी मेलेली कोंबडी भाभीसमोर येऊन उभी राहिली. क्षणभर तिला काहीच कळेना, ती अवाक होऊन त्या परतलेल्या कोंबडीकडे एकटक पाहत राहिली. या प्रकारामुळे रेहाना भाभीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अन् अलगद डोळ्यातून ओघळलेल्या आसवांच्या थेंबाने तिचे गाल ओले केले.रेहाना भाभीच्या या मुर्गीची चर्चा मात्र, सर्वत्र सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com