पाथर्डी-शेवगावच्या पूरग्रस्तांना कोकणप्रमाणे मदत द्या

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा आ.राजळे यांचा इशारा
पाथर्डी-शेवगावच्या पूरग्रस्तांना कोकणप्रमाणे मदत द्या

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात जोरदार आतिवृष्टी होऊन शेती पिकांसह जमीनीचे, वीजेचे खांब, रस्ते, पुल बंधारे यांच्यासह जलसंधारणाच्या कामाचे मोठे नुकसान झाले.

अनेक गावात पुरांचे पाणी घरात शिरल्याने बरीच घरे पडून धान्य, कपडे भांडी व संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. गाय बैल, म्हशी, शेळ्या, मेंढया, कोंबडया पाण्यात वाहुन गेल्या गेल्या. त्यामुळे राज्य सरकारने कोकण व कोल्हापुर, सातारा या भागाच्या धर्तीवर खास बाब म्हणुन पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी तातडीने मदत जाहीर करून प्रत्यक्ष अनुदान वाटप सुरू करावे अन्यथा अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधीत शेतकऱ्यांसह राज्य सरकारविरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे.

पाथर्डी शेवगाव विधानसभेच्या आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात दि. ३० व ३१ ऑगस्ट तसेच ४ व ५ सप्टेंबर २०२१ रोजी अतिवृष्टी होऊन पुरामुळे पाथर्डी तालुक्यातील सर्व महसूल मंडळात व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीपिके, फळबागा नष्ट झाल्या आहेत, अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, भांडी कपडे व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्या, कोंबड्या आदीसह हजारो जनावरे मृत पावली असुन काही जनावरे पुरात वाहून गेली आहेत.

गावातील व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे आर्थीक नुकसान झाले आहे. पुरांच्या पाण्यामुळे वीजेचे खांब, रस्ते, पुल, बंधारे व जलसंधारणाच्या कामाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करून शासनाच्या विविध विभागाकडे अहवाल पाठवून सानुग्रह अनुदानाची मागणी केलेली आहे. तसेच मी स्वतः राज्याचे मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई मंत्रालयात समक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती सांगुन कोकण, कोल्हापुर, सातारा, सांगलीच्या धर्तीवर खास बाब म्हणुन पाथर्डी शेवगाव तालुक्यासाठी मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

परंतु अतिवृष्टी होऊन महिना होत आला तरी सरकारने अद्याप मदतीची कुठलीही घोषणा केली नाही किंवा अनुदान वाटप सुरू झाले नाही. सरकारकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टी व पुर परिस्थीतीने झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता कोकण, कोल्हापुर, सातारा प्रमाणे तातडीने तात्कालिक मदत म्हणुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या मदत पुर्नवसन विभागाकडून अनुदान मिळणे आवश्यक होते.

एकीकडे राज्यातील कोकण कोल्हापुर,सातारा येथील आपत्तीग्रस्तांना शासन निर्णय होऊन प्रत्यक्ष मदतनिधीचे वाटप सुरू आहे.तर दुसरीकडे राज्यातीलच पाथर्डी शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊनही पुरग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केली गेली नाही व निधी वाटप नाही. यामुळे दोन्ही तालुक्यातील अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधीत शेतकरी व जनतेच्या मनात राज्य सरकारविषयी असंतोषाची भावना निर्माण होत असल्याने अतिवृष्टी बाधीतांना सरकारने तात्काळ मदत जाहिर करून प्रत्यक्ष अनुदान वाटप सुरू करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री व विभागीय आयुक्तांनी तात्काळ तात्कालिक मदत व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य सरकारच्या निधीसाठी पाठपुरावा करून शासन निर्णय होऊन मदत वाटप सुरू केले आहे. त्याच निकषानुसार पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीतांसाठी तात्काळ मदत देऊन वाटप सुरू करावे अन्यथा अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधीतांसह सरकारविरोधात मोठे जनआंदोलन केले जाईल असा इशाराही आ.राजळे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.