अतिपावसामुळे पाचेगावात काही पिके सडू लागली
सार्वमत

अतिपावसामुळे पाचेगावात काही पिके सडू लागली

Arvind Arkhade

पाचेगाव |वार्ताहर|Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पिवळी पडली आहेत तर अधिक दिवस पाणी साठलेल्या ठिकाणची पिके सडू लागली आहेत.

पाचेगाव परिसरात आत्तापर्यंत 436 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जून महिन्यात 188 मिलिमीटर तर जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत 212 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या दाहा दिवसांत 36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 436 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सरासरीनुसार परिसरात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.

या भागात पहिल्यांदाच पिकाला विहिरीचे व बोअरवेलचे पाणी न देता पावसाच्या पाण्यावर यंदा प्रथमच खरिपातील पिके उभी आहेत.त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग आनंदात दिसत होता, पण अति पावसामुळे पुन्हा खरिपातील हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय असा प्रश्न आता शेतकर्‍यांना भेडसावत आहे. या भागात पावसाने सरासरी ओलांडली असली तरी विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी अजूनतरी म्हणावी तेवढी वाढलेली दिसत नाही.

या सतत चालू असणार्‍या सरींमुळे शेतकर्‍यांची खरिपात प्रामुख्याने घेतलेली सोयाबीन, कपाशी, बाजरी, मूग, भुईमूग, तूर ही पिके पिवळी पडून सडू लागल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी नव्हे या भागात खरिपातील पिके हिरवीगार उभारून आली होती, पण आता मात्र या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अजून पुढे होणार्‍या पावसाची देखील शेतकरी वर्गाने धास्ती घेतली आहे.

शेतकर्‍यांपुढच्या अडचणी वाढल्या

शेतकर्‍यांपुढे कायम अडचणी निर्माण होतात. शेतकर्‍यांनी घेतलेली महागडे बियाणे त्यातच त्यांची उगवणक्षमता कमी, काही बियाणे उतरले नाही. काही शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करून पिके जोमात आणली होती, पण या सतत पडणार्‍या पावसाने मात्र शेतकरी पुन्हा एकदा मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.

- अशोकराव नांदे, सामाजिक कार्यकर्ते पाचेगाव

आमच्या भागात मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. मागील वर्षी या भागात पावसाची 733 मिमी नोंद होऊन 29 इंच पाऊस पडला होता. पण आता दोन महिन्यांत 400मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या पडणार्‍या पावसामुळे खरिपातील पिके आता मात्र काही ठिकाणी सडू लागली आहे, त्यामुळे माझ्या बरोबर इतर शेतकरी देखील चिंता करू लागला आहे.

- वामनराव तुवर, ग्रामपंचायत सदस्य

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com