
अकोले | प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते, अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचोरे व अकोलेचे तहसीलदार सतिश थेटे यांच्यात वीरगाव येथे गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीवरून आज शुक्रवारी दुपारी तहसीलदार यांच्या दालनातच जोरदार घमासान पहायला मिळाले.
दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी वेळीच हस्तक्षेप करत वादावादी वर पडदा टाकला. यावेळी घुगे यांनी रावसाहेब वाकचौरे ,संतप्त वीरगाव ग्रामस्थ आणि तहसीलदार यांचेत समन्वय घडवून आणला त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
गुरुवारी अकोले तालुक्यातील देवठाण,वीरगाव,गणोरे ,डोंगरगाव,पिंपळगाव निपाणी या आढळा खोऱ्यातील गावांत ढगफुटी सदृश्य परिस्थिती उदभवली. यामुळे अनेक आदिवासी समाजाच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले,अनेक घरातील धान्य,भांडी,कपडे आदी जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या,घरांची पडझड झाली. शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या ढगफूटीची माहिती रावसाहेब वाकचौरे यांनी तहसीलदार थेटे यांना भ्रमणदूरध्वनीवरुन देऊन घरकुलांमध्ये पाणी घुसलेल्या आदिवासींची व्यवस्था करण्याची मागणी केली. व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. या दरम्यान वाकचौरे व तहसीलदार थेटे या दोघांमध्ये बोलण्याच्या ओघात हमरीतुमरी झाली. यानंतर वीरगाव ग्रामस्थ तातडीने अकोलेत तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनासाठी उपस्थित झाले. यावेळी तहसीलदार यांच्या दालनातच त्यांना रावसाहेब वाकचौरे व वीरगाव येथील आदिवासी ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला.
यावेळी सहा.पोलीस निरीक्षक घुगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार व रावसाहेब वाकचौरे यांना शांत केले. आदिवासी समाजाच्या प्रश्नी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन घुगे यांनी यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना दिले. नुकसानीची पाहणी करुन महसूल प्रशासनाच्या सहाय्याने योग्य ती कार्यवाही करुन संकटग्रस्त वीरगाव ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर हा तणाव निवळला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, शंभू नेहे आदीसह वीरगाव येथील ग्रामपंचायत, सोसायटी, दूध संस्था यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कायकर्ते आदिवासी बांधव उपस्थित होते. घुगे यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेमुळे पुढील ताणतणाव निवळला व त्यानंतर महसूल प्रशासन तातडीने वीरगावकडे रवाना झाले.