अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या - विवेक कोल्हे

विवेक कोल्हे
विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिके भुईसपाट होऊन शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांना दिवाळी सणापूर्वी शासनाने जाहीर केलेले अनुदान वाटप करावे. तसेच विमा कवच घेतलेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट पीक विम्याची रक्कम दिवाळीच्या आत देण्यात यावी, अशी मागणी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून मागील तीन महिन्यात कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे सततच्या पावसाला शेतकरीही आता कंटाळले आहेत.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, कापूस, मिरची, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकर्‍यांनी पीककर्ज काढून पिकांची लागवड केली. अंतर मशागत, खते, कीटकनाशके यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. नेमके उत्पन्न हातात येण्याच्या वेळी पावसाने सतत झोड उठवली. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. ते अनुदान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा व तालुका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही तातडीने करून शेतकर्‍यांना विनाविलंब दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे. महसूल व कृषी विभागाने एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याअभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर आणेवारी लावताना शासनाचे निकष व सत्य परिस्थिती पाहून आणेवारी जाहीर करावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com