
अहमदनगर (प्रतिनिधी)
शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. यात सर्वाधिक पावसाची नोंद बांबोरी (ता. राहुरी) तर पोहेगाव (ता. कोपरगावमध्ये) झाली आहे.
या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून झालेली पावसाची आकडेवारी ही ६५ मिली मीटरने पेक्षा अधिक आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात अन्य भागासह नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडात पाऊस झाला. या पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी १३९ टक्के झाली असून आतापर्यंत ६५०.३ सरासरी मिलीमीटर पाऊस झालेला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या गावांना सर्तकेतचा इशारा दिला असून पूरातून वाहने न चालविण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तास चाललेल्या पावसामुळे नगर शहरातील सखल भागात पाणी साचले तर अनेक गल्ली आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पावसाचे हे पाणी चारी छोटी वाहने, रिक्षामध्ये शिरले. पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील या पावसाने हजेरी लावली.
शुक्रवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वांबोरीत ७३.३ मिलीमीटर झाला असून त्या खालोखाल पोहेगावात ६५.८ मिलीमीटर झालेला आहे. यासह बेलापूर (श्रीरामपूर) २८.३, पुणतांबा (राहाता) ४१.३, मिरजगाव ४२.३ आणि माहीजळगाव ५२ (कर्जत), चापडगाव २२.८, ढोरजळगाव २५.३ (शेवगाव), ब्राम्हणी २२ (राहुरी), तळेगाव ३९, पिंपळनेर २३.८ (संगमनेर), जेऊर २४.३ (नगर), पारनेर ३३, सुपा ५०, निघोज २६.३, पळशी २४.५ (पारनेर) यांचा समावेश आहे.
नगर शहरात वीज पुरवठा खंडीत
दुपारी तिन वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर नेहमी प्रमाणे शहरातील विज गायब झाली. शहर परिसारातील सर्वच ओढे, नाल्यांना पूरासारखी स्थिती निर्माण झाली होती. तर सीना नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यात शहराजवळील महावितरणाच्या उपकेंद्रात बिघाड झाल्याने नगर शहरात अनेक ठिकाणी विज पुरवठा विस्कळीत झाला होता. वीज पुरवठा सुरूळीत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
पिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून तळे बनले आहे. अनेक ठिकाणी चारा पिके, सोयाबिन हे गुडगाभर पाण्यात असून या पिकांची काढणी सोडा, रब्बी हंबगामासाठी वाफसा कधी होणार आणि कधी पेरणी होणार या चिंतेत शेतकरी आहेत. दुसरीकडे हेक्टरी हजारो रुपये खर्च करून केलेली कांदा लागडीचे काय होणार याची शेतकऱ्यांना काळजी आहे.