संततधार पावसाने झोडपले; अनेक नद्या-नाल्यांना पुर

संततधार पावसाने झोडपले; अनेक नद्या-नाल्यांना पुर

सीना दुथडी : घरांमध्ये शिरले पाणी

अहमदनगर | प्रतिनिधी

सोमवारी रात्रीपासून नगर शहरासह (Ahmednagar City) जिल्ह्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. सीना नदीला (Sina River) पूर आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील (Ahmednagar-Kalyan Highway) पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली (traffic jam) होती.

सीनाकाठच्या वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले होते. जिल्ह्याच्या दक्षिण भागातही पावसाच्या मुसळधार हजेरीने नदी-नाले तुडूंब आहेत. नगर तालुक्यातील जेऊर (Jeur) येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgoan) तालुक्यात पावसाने जबर फटका दिला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने नागरिकांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली होती.

हवामान विभागाने (IMD alert) या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. नगर जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी दुपारनंतर हजेरी लावली. नगर शहरात सोमवारी दुपारी तुरळक पाऊस झाला. सायंकाळनंतर श्रीरामपूर (Shrirampur), राहुरी (Rahuri) भागात पावसाने जोर धरला. सायंकाळी नगर शहरासह दक्षिण जिल्हा पावसाने व्यापला. वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पाऊस सुरू होता.

या पावसामुळे सीना नदीला पूर (Sina river Flood) आला. नदीशेजारी अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. नगर-कल्याण मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक खोळंबली होती. शहरातील अनेक सखल भागात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले. त्यामुळे अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्समधील तळभागातील दुकानांत पाणी शिरले होते. पावसामुळे उपनगरांतील अनेक रस्ते चिखलात हरवले होते.

संततधार पावसाने झोडपले; अनेक नद्या-नाल्यांना पुर
पुलावरून पाणी जात असतांना ट्रक नेण्याचा केला प्रयत्न आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

तालुक्यातील जेऊर येथे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सीना व खारोळी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त होते. जेऊर गावाची बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. अनेक घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. नदीला आलेल्या पुरामुळे नगर-औरंगाबाद वाहतुकीला फटका बसला.

महापालिका प्रशासन सज्ज

नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूकीला अडथळा झाला. नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. या स्थितीचा आढावा मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी घटनास्थळी जाऊन घेतला. नगर शहरामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवल्यास महानगरपालिकेची आपत्कालीन विभागाची पथके सज्ज आहे. नागरिकांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास काही अडचणी असल्यास त्वरित अहमदनगर महापालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त गोरे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com