अतिवृष्टीचे अनुदान तीन दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे घेरावो आंदोलन मागे
अतिवृष्टीचे अनुदान तीन दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तीन दिवसांत अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग होईल, तसेच अग्रिम विमा अनुदानही लवकरच मिळेल, असे लेखी आश्वासन तहसीलदार श्री. वाघ यांनी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आपले घेरावो आंदोलन मागे घेतले.

अतिवृष्टी अनुदान आणि अग्रीम विमा अनुदानाच्या मागणीसाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या दालनात घेरावो आंदोलन करण्यात आले.

यावेळी कानडे म्हणाले की, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त मंडळातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या नावानिशी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार शेतकर्‍यांनी केवायसी व आवश्यक ती पुर्तता केली आहे, तरी अद्यापही हजारो शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झाले नाही. मागील दोन महिन्यांपासून अनुदानाअभावी नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.

शेतकर्‍यांनी एक रुपया भरून नविन पीक विमा योजनेअंतर्गत त्यांच्या खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. तालुक्याच्या आमसभेत शेतकर्‍यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीबद्दल आक्रोश व्यक्त केला. त्यानुसार आ. लहू कानडे यांनी पीक विमा योजनेतील नियमानुसार 20 दिवसांपेक्षा अधिक खंड झाल्यामुळे 25 टक्के विमा अग्रीम अनुदान विमा कंपन्यांनी तात्काळ द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली. त्यानुसार कृषी आणि तहसील विभागाने कार्यवाही केली. शेतकर्‍यांनी ई- पीक पाहणी करून सहकार्य केले. तालुक्यातील सर्व कृषी मंडळे अग्रीम पीक विम्यासाठी पात्र ठरली असताना शासनाकडून अद्यापही अग्रीम पीक विम्याची 25 टक्के रक्कम शेतकर्‍यांना प्राप्त झाली नाही. सध्या शेतकरी अत्यंत अडचणीत असून दसरा, दिवाळी सणाचे दिवस तोंडावर आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना नियमानुसार त्यांच्या हक्काची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी अशोक कानडे यांनी केली.

तालुक्यातील 25 हजार बाधित शेतकर्‍यांपैकी सुमारे 15 हजार शेतकर्‍यांना अनुदान मिळाले असून केवायसी अभावी काही जणांचे अनुदान जमा होणे बाकी आहे. केवायसी न झालेल्या शेतकर्‍यांनी तातडीने ती करून घ्यावी, केवायसी झालेल्या शेतकर्‍यांना शनिवारपर्यंत अनुदान प्राप्त होईल, तसेच पीक विम्याची अग्रीम रकमेसंदर्भात आजच शासन स्तरावर निर्णय झाला असून ही रक्कमही लवकरच शेतकर्‍यांना मिळेल, असे लेखी आश्वासन तहसीलदार श्री. वाघ यांनी यावेळी दिले. तहसीलदार श्री. वाघ यांच्या आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी काँग्रसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, अमृत धुमाळ, प्रविण काळे, विजय शिंदे, अशोक भोसले, रा. ना. राशिनकर, अविनाश पवार, भागीनाथ शिरोळे, बाळासाहेब शिरोळे, कार्लस साठे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अजिंक्य उंडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com