जोरदार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहिली
सार्वमत

जोरदार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहिली

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहिली. आसपासचे छोट्यामोठ्या तलावांतही पाण्याची आवक झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने कोसळत होता. जोराचा झालेल्या या पावसामुळे नगर शहरासह ग्रामीण भागात पाणीच पाणी झाले होते. नगर शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. अऩेक ठिकाणी कमरेएवढे पाणी साचले होते.

शहराच्या मध्यभागात सखल भागात पाण्याचे अक्षरशः लोंढे येत होते. त्यात पटवर्धन चौक, दिल्लीगेटचा काही परिसर, बागरोजा हडको, सर्जेपुरा चौक, अमरधाम परिसर, लक्ष्मीबाई कारंजा चौक या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळी घराबाहेर पडलेले रात्री उशिरापर्यंत बाहेरच अडकून पडले होते. घराकडे कोणत्या मार्गाने जावे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. केवळ शहरांतर्गतच नव्हे, तर शहरातून जाणारे महामार्ग देखील पाण्याखाली गेले होते.

विजांचा कडकडाट, वारा आणि पाऊस असे एकाचवेळी सुरू होते. नंतर वारा बंद झाल्याने पावसाची संततधार सुरू होती. विशेष म्हणजे एवढा पाऊस होऊनही अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत होता. शुक्रवारी दिवसभर जोराच्या पावसाबरोबरच कायम टिकून राहिलेल्या वीज पुरवठ्याचीही चर्चा होती. या पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहिली. सीना नदी, भिंगार नाला भरून वाहू लागल्याने अनेकांना अडकून पडावे लागले.

सकाळी कल्याण रस्त्यावरील सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक वेळ तेथील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्या परिसरातून नगरमध्ये रोजगारासाठी येणार्‍यांना सकाळी आपल्या कामावर पोचता आले नाही. भिंगार नाल्याला पूर आल्यामुळेही अनेक वाहने ठप्प झाली होती. नगर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने दोन्हीकडे पाणी सीनेत गेल्याने सीनेचा फुगवटा वाढला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com