
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
भातकुडगाव मंडलातील 17 ते 18 गावांत झालेल्या अतिवृष्टी व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच वादळाने पडलेले विजेचा खांब, तुटलेल्या विजेच्या तारा, दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, कांद्याला 20 रुपये प्रती किलो प्रमाणे हमीभाव मिळावा, शासनाने शेतकर्यांच्या कांद्याची नाफेड मार्फत खरेदी करावी, कांदा अनुदानाची मुदत 30 जूनपर्यंत वाढवावी, मागील वर्षाची अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकर्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी आदी महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली भातकुडगाव फाटा येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी शेवगाव-नेवासा रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. यावेळी माजी सभापती डॉ. घुले यांनी तालुक्यातील शासकीय अधिकार्यांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींवरही खरपूस टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा दौर्यात शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही.
त्यामुळे मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री, कृषिमंत्री व मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांना या परिसरातील शेतकर्यांचे कोणतेही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधितांच्या केवळ सवंग लोकप्रियतेच्या कामकाजाचा तीव्र निषेध व्यक्त केला. यामुळे आपल्या अडचणी आपल्यालाच सोडवाव्या लागतील. त्यामुळे एकत्रित संघटीतपणे प्रश्नांचा लढा द्यायचा आहे आणि आपले हक्काचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत. आपल्याला आपले हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ठणकावून सांगितले.
या परिसरातील आव्हाणे, वाघोली, ढोरजळगाव शे, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव या गावांत देखील अतिवृष्टी व पावसामुळे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करताना या गावांचा देखील समावेश करावा, असे माजी सभापती डॉ. घुले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल मडके, ज्ञानेश्वरचे संचालक पंडितराव भोसले, बबन भुसारी, युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मुंढे, माउली निमसे, अशोक मेरड, राजेंद्र आढाव, राजेंद्र देशमुख, डॉ. सुधाकर लांडे, आदींसह परिसरातील कार्यकर्ते ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
परीविक्षाधीन तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार रवींद्र सानप, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी निवेदन स्वीकारून शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्यासाठी 18 टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन तीन दिवसांत तालुक्याचा नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, गुप्तवार्ता विभागाचे बाबासाहेब गरड, बप्पासाहेब धाकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.