अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

आमदार काळेंच्या सूचनेनंतर पंचनामे सुरु
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले असून वीज पडून जनावरेही मृत्युमुखी पडले आहे. मतदार संघातील सर्व गावातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या परतीचा पाऊस जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव शहरात वीज पडून जनावरे देखील मृत्युमुखी पडले आहे. आ. काळे यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी त्यांच्या समवेत होते.

सर्व नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली. या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबरच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून घरातील संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापार्‍यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे साठविलेल्या कांद्याचे देखील नुकसान झाले आहे.

कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर, बैलबाजार रोड, गोकुळनगरी, खंदकनाला, स्टेशनरोड, खडकी, जुनीगंगा देवी मंदिर, जनार्दन स्वामी आशम, टाकळी रोड आदी परिसर तसेच ग्रामीण भागातील जेऊर पाटोदा, मढी बु., चांदेकसारे, कोकमठाण (माळवाडी), शहाजापूर, टाकळी, माहेगाव देशमुख, कुंभारी, खिर्डी गणेश (भास्कर वस्ती), कोळगाव थडी आदी गावात झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आ. काळे आपल्या यंत्रणेला सतर्क करून नागरिकांना मदत केली. झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई नुकसानग्रस्तांना मिळवून देऊ, अशी ग्वाही देऊन नुकसानग्रस्तांना त्यांनी दिलासा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com