अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

पीक खराब झाल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्नही निघेना
अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील कुकडी डावा कालवा पट्यात कांदा लागवड उशीरा सुरू झाली आहे. गतवर्षीचा कांदा अद्याप बाजारपेठेत न गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट आली असून यामुळे शेतकर्‍यांचा खर्च देखील निघत नसल्याचे चित्र आहे.

तालुक्यात दिवाळीच्या दरम्यान जवळपास कांदा लागवड पूर्ण होत असते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व पुन्हा कांदा रोपे तयार करण्यासाठी शेतकर्‍यांनी अधिक वेळ घेतल्याने कांदा लागवडीसाठी अद्याप म्हणावी तशी सुरुवात न झाल्याने कांदा लागवड उशीरा सुरू होत आहे. कांद्याचे नगदी पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागत असल्याने उत्पन्नाच्यादृष्टीने हे पीक शेतकर्‍यांना परवडत असते. गतवर्षीचा विचार केला तर कांदा या पिकाला एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंत किलोला 15 ते 18 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी पूर्णपणे तोट्यात गेला आहे. साधारण कांदा पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा खर्च येतो.

यावर्षी भावच नसल्याने आणि त्यात अतिवृष्टी, खराब हवामान यामुळे कांदा चाळीतील बराचसा कांदा खराब झाला. तसेच भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रत्यक्ष उत्पादन कमी, भाव कमी व कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही. हेक्टरी कांदा उत्पादक शेतकरी 50 ते 75 हजार रुपये तोट्यात असल्याने नवीन लागवडीसाठी शेतकरी उत्सूक नसल्याचे चित्र आहे. सध्या कांद्याला 20 ते 25 रुपये किलो भाव असला तरी बहुतांश माल खराब झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. ज्यांनी कांदा रोपे तयार करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्यांना अतिवृष्टीमुळे कांदा रोपे पुन्हा तयार करावे लागले आहेत. अशाप्रकारे शेतकर्‍यांचे यंदा दुहेरी नुकसान झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com