अतिवृष्टीने नगर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरी 'निराशाच'
सार्वमत

अतिवृष्टीने नगर तालुक्यात शेतकऱ्यांच्या पदरी 'निराशाच'

नगर तालुक्यात नैसर्गिक संकटाने पिकांचे मोठे नुकसान

Arvind Arkhade

अहमदनगर|वार्ताहर|Ahmednagar

अतिवृष्टीमुळे नगर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांची उभी पिके भुईसपाट झाली असून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे. या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

नगर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे साकत खुर्द, वाळकी, भोरवाडी, वाटेफळ, दहिगाव, वडगाव तांदळी, रुईछत्तीसी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून कपाशी, मका, बाजरी, मूग, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे तर शुक्रवारी (दि. 31) विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे दहिगाव, साकत या ठिकाणी मका पिके भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.

सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच करोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याही वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवाती पासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरिपाची लागवड केली.

अशातच काही ठिकाणी सोयाबीन, बाजरी बियाणे उगवले नसल्याने बर्‍याच शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यातून जी पिके वाचली त्यांना युरिया आदी खते साठेबाजीमुळे वेळेवर उपलब्ध झाली नाही. अशातच सलग चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या सर्व संकटातून वाचलेली उरली सुरली पिकेही डोळ्यादेखत सडू लागली आहेत.

कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला असून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून झडू लागली आहे.

तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात पाऊस असल्याने मूग, बाजरी, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनी केली.

सलग दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवार, रविवार सोमवार सलग सुट्या असल्यामुळे सध्या अडचण येत असून मंगळवारी यासंदर्भात तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

सलग दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवार, रविवार सोमवार सलग सुट्या असल्यामुळे सध्या अडचण येत असून मंगळवारी यासंदर्भात तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. - रवींद्र भापकर, उपसभापती पंचायत समिती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com