अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी - कोल्हे
स्नेहलता कोल्हे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी - कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहर (Kopargav City) व मतदार संघात सलग दोन दिवस गुलाब चक्री वादळामुळे (Gulab Cyclone) झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांची वाट लागली आहे. शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साठले आहे. घरांची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्याची भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehalta Kolhe) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) व तहसीलदार विजय बोरुडे (Tehsildar Vijay Borude) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस 110 मिलीमिटरच्या वर पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, बाजरी, कापूस, लाल कांदा, फळबागा आदी काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्यासाठी रोपे टाकली त्याचेही अतोनात नुकसान झाले. असंख्य शेतकर्‍यांचा ऊस शेतातच आडवा झाला आहे. या अस्मानी संकटामुळे खरिपाबरोबरच, रब्बी पीक नियोजनावर निसर्गाने पूर्णपणे वरवंटा फिरवला आहे.

आगास पिके आज पूर्णपणे पाण्यात सडून चालली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत. कोपरगाव शहराच्या खडकी तसेच ग्रामीण भागातील ब्राम्हणगाव, येसगाव येथे अनेक घरांच्या पडझडी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन हाताळणार्‍या अधिकारी वर्गाला नुकसानीची पूर्वसूचना देऊन मदतीचे आवाहन केलेले आहे.

शासनाने तातडीने या शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून त्याची भरपाई तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी तसेच अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. तेव्हा शासनाने रस्ता दुरुस्तीकडेही विशेष लक्ष पुरवावे व त्यांच्या दुरुस्तीसाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असेही सौ. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.