अस्तगाव परिसरात पावसाने नुकसान
सार्वमत

अस्तगाव परिसरात पावसाने नुकसान

अनेक शेतकर्‍यांचे नव्याने पेरलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले : अनेकांच्या कांद्याच्या चाळीत पाणी

Anant Patil

अस्तगाव (वार्ताहर)- सोमवारी दुपारी 3 वाजे नंतर अस्तगाव येथे मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टी सारख्या या पावसाने अनेक शेतकर्‍यांचे नव्याने पेरलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. तसेच अनेकांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेतातील पाणी वाहुन येत असल्याने अस्तगाव खंडाळे रस्त्यावरची तसेच अस्तगाव पिंप्रीनिर्मळ रस्त्यावरची रहदारी ठप्प झाली होती.

काल दुपारनंतर साडेतीन नंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. पावसाच्या तडाखेबाज आगमनाने सर्वत्र पाणीच पाणी केले. दिड तासात मुसळधार बरसलेल्या पावसाने सर्वच शेतात पाणीच पाणी दिसुन येत होते. नव्याने पेरलेल्या खरीप पिकांना यांचा मोठा फटका बसणार आहे. दोन दिवसांपुर्वीही मुसळधार पाउस झाल्याने ते पाणी अजुनही शेतातच होते. कालच्या उग्ररुप धारण केलेल्या पावसाने शेतातुन पाणी वाहिले.

नळे वस्ती भागात थोरात यांच्या घरात पाणी शिरले. दत्तु भाउराव नळे यांचा चाळीत भरलेला 5 टॅक्टर कांदा भिजला. त्यांच्या घराच्या अंगणात एक फुटभर पाणी होते. कांद्याच्या चाळीत पाणी शिरले. भाउसाहेब कारभारी नळे यांच्याही कांद्याच्या चाळीत पाणी शिरले. त्यांचेही नुकसान झाले. गावठाणातील अदिवसी वस्तीतील नानासाहेब सोनवणे या रहिवाश्याच्या घरात अर्धाफुट पाणी साठले होते.

रस्त्यांना ओढ्यांचे स्वरुप

अस्तगाव कडून हायवे कडे जाणार रस्ता व राहात्यावरुन अस्तगाव कडे येणार्‍या रस्त्याच्या चौफुलीवर तीन फुटापर्यंत पाणी होते. त्यामुळे कोणतेही वाहन पाणी ओंलांडून जावु शकत नव्हते. त्यामुळे रहदारी बराच वेळ उशीरापर्यंत ठप्प होती. अस्तगाव पिंप्रीनिर्मळ रस्त्याला ही बर्‍याच ठिकाणी अतिक्रमणे असल्याने या रस्त्यावरुन अर्धाफुट पाणी वाहत होते. काही काळ हा रस्ता पाण्याच्या प्रवाहात हारवल्याचे चित्र होते. या रस्त्यावरील तसेच जेजुरकर वस्तीकडून येणार्‍याा ओढ्याचे पाणी बिरोबा मंदिर परिसरातील तळ्या सारख्या परिसरातुन तुडूंब भरुन वाहत होते. खाली हे पाणी रस्त्यावर येवुन गावातील ओढ्यातुन वाहत होते. या ओढ्याचे पाणी आणि नळे वस्ती भागातील पाणी साठवण तलावातुन पुढे सातमोर्‍या जवळ एकत्र होवुन खाली प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. सातमोर्‍या जवळील पाच घरकूलांच्या खोल्यांना या पाण्याने वेढा मारला होता. चाळीसवाडी भागात लक्ष्मी बाळु पवार या महिलेच्या घराची भिंत या पावसाने पडली. चोळकेवाडी, मोरवाडी, तरकसवाडी, गोल्हार वाडी या अस्तगाव च्या वाड्यांच्या परिसरातील शेतात पाण्याचा डोह साठले होते.

पिकांना फटका!

नुकत्याच पेरण्या झाल्या असल्याने काही बियाणे माती आड आहेत तर काही उगवून आले आहेत. हे सर्व पेरणी झालेले क्षेत्र या मुसळधार पावसाने वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्त पाण्यामुळे बियाणांची उगवण क्षमता नष्ट होणार आहे. या शिवाय शेतातील पाणी जिरत नसल्याने उगवण झालेल्या चिमुकली रोपे सडणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. दुपार पेरणीचे संकट या शेतकर्‍यांपुढे उभे ठाकले आहे. महागडी खते, बियाणे, व मेहनतीचा खर्च वाया जाणार आहे. पेरलेले बियाणे वाहुन गेल्याची भिती शेतकरी वर्गात आहे. या पिकांचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना आधार द्यावा अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, अस्तगाव सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव चोळके, गणेश चे संचालक विजय गोर्डे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com