अतिवृष्टीची मदत तातडीने द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर बिर्‍हाड मोर्चा - घोगरे

File Photo
File Photo

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने 17 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेल्या मदतीच्या शासन निर्णयात जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दिवाळी गोड करू म्हणणारे आता बिळात बसले असून अतिवृष्टी होऊन दोन महिने उलटून गेले तरी शेतकर्‍यांना एक दमडीची शासकीय मदत मिळाली नाही. ती तातडीने शेतकर्‍यांना द्या अन्यथा शेतकर्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पशुधनासह बिर्‍हाड मोर्चा काढू, असा इशारा लोणी खुर्दच्या कृषीभूषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी दिला आहे.

जिल्ह्यात दोन महिन्यांत दोनदा अतिवृष्टी झाली. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीग्रस्त नुकसानीचे मंत्र्यांनी प्रशासकीय फार्स दाखवून दौरेही केले. दिवाळीपूर्वी शासकीय मदत देऊ, अशी घोषणाही करण्यात आली. या प्रश्नासाठी राहाता तहसीलवर शेतकर्‍यांनी पशुधनासह बिर्‍हाड मोर्चा काढला. त्यावेळी तहसीलदारांनी शेतकर्‍यांचे पंचनामे झालेले असून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर वितरण करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून 17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना शासकीय मदत देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. यात नगर जिल्हाचा समावेश नाही.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे शासनाने पाठ फिरवली असून हे अतिशय संतापजनक आहे. पीक विमा हप्ता भरूनही परतावे नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. दोन महिन्यांपासून पंचनाम्याचे केवळ नाटक करून कागदी घोडे नाचण्याचा प्रकार केला आहे. 17 नोव्हेंबरच्या मदतीच्या शासन निर्णयातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डावलून अन्याय केला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत तातडीने द्या, अन्यथा राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर पशुधनासह बिर्‍हाड मोर्चा काढला जाईल, असा इशारा प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com