
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कोपरगाव (Kopargav) मतदार संघातील सर्वच गावातील उभ्या पिकांचे (Crops) मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले आहे. मात्र ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकर्यांना मिळाले असून उर्वरीत अनुदानाची (Grant) शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. हे अनुदान तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना द्या, अशी मागणी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव मतदार संघात खरीप हंगाम 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांचे तसेच कांदा रोप, भाजीपाला व चारा पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. अनेक ठिकाणी तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेला शेतकरी अजूनच अडचणीत आला होता. झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई अनुदान मिळेल या आशेवर बसलेला नुकसानग्रस्त शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहे. अनेक शेतकर्यांनी पिक विमा देखील भरलेले आहेत. मात्र पिक विमा कंपन्यांनी (Crops Insurance Company) देखील शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करून शेतकर्यांची चेष्टा केली आहे.
कोपरगाव (Kopargav) तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जवळपास 34 हजार हेक्टर क्षेत्राचे 46 हजार 694 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. यापैकी ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे 1.31 कोटी मिळाले आहेत. परंतु सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे 27.35 कोटी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 53.97 कोटी असे एकूण जवळपास 81.32 कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी आहेत. सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरु असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकर्यांना अतिवृष्टी अनुदानाची रक्कम मिळाल्यास शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होणार आहेत. त्यामुळे तातडीने अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी केली आहे.