अतिवृष्टी नुकसानीचे पैसे त्वरीत वर्ग न झाल्यास आंदोलन

भाकपचे नेवाशाच्या तहसीलदारांना निवेदन
अतिवृष्टी नुकसानीचे पैसे त्वरीत वर्ग न झाल्यास आंदोलन

नेवासा |शहर प्रतिनीधी| Newasa

नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही तर तहसील कार्यालयासमोर उग्र स्वरुपाचे अंदोलन करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी पावसाने थैमान घातले. महाराष्ट्रात प्रचंड अतीवृष्टी झाली. अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतमालाची प्रचंड हानी झाली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यातील शेतकर्‍यांना अतीवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र तालुक्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे होवुनही अद्याप पावतो एक दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिला आहे. नेवासा तालुक्यात वाटप झाले नाही. तसेच पिक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना शेकडो कोटी रुपयाचे भरपाई मिळण्याची गरज असताना पिक विम्याचेही पैसे शेतकर्‍यांना मिळाले नाहीत.

शेतकर्‍यांना येत्या 15 दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, शेतकर्‍यांना 20 मार्चपर्यंत अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पैसे तातडीने वर्ग करावेत, अन्यथा होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अहमदनगर जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, कॉ. बाबा आरगडे, नंदकुमार उमाप, लक्ष्मण शिंदे, दत्तात्रय गवारे, बाळासाहेब भुजबळ, रामदास जरे आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com