सर आली धावून, रस्ता गेला वाहून!

अतिवृष्टीमुळे आंबी स्टोअर रस्त्यावरून वाहिले पाणी, उभी पिके सडली
सर आली धावून, रस्ता गेला वाहून!

आंबी |वार्ताहर| Ambi

परतीच्या पावसाने राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी काठावर वसलेल्या आंबी-अंमळनेर गावांना जोरदार तडाखा बसला असून अतिवृष्टीमुळे पिकांमधून पाणी खळखळून वाहत आहे. त्यामुळे आंबी-आंबी स्टोअर या रस्त्यावरून पाणी वाहत असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील मुरूम वाहून गेला असून खडी उघडी पडली आहे.

आंबी ग्रामपंचायतीचे सरपंच संगीताताई बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप साळुंके, रावसाहेब फुलमाळी, गणेश कोळसे, मंगल विश्वनाथ जाधव, यमुनाताई सोमनाथ कोळसे, उज्वला सुभाष डुकरे, स्मिता सुनील लोंढे यांनी तसेच सर्व ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांनी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आंबी ते आंबी स्टोअर रस्ता खडीकरण केला. मात्र सततच्या पावसाने सदर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.

परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. नगर जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यावर तरंगताना पाहण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली आहे. कपाशी, सोयाबीन, चारापिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com