पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहाय्यक, ग्रामसेविका व कर्मचारी निलंबीत

पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहाय्यक, ग्रामसेविका व कर्मचारी निलंबीत

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील जेऊरहैबती, चिलेखनवाडी व देवसडे येथील अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन कृषीमंत्र्यांनी चिलेखनवाडीच्या कृषी सहायक रोहिणी सुभाष मोरे यांच्यासह ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे या तिघांना निलंबीत केले आहे.

पैसे घेत असल्याबाबत तक्रार ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाकडून पुराव्यानिशी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

नेवासा तालुक्यात सध्या कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. परंतु पिकांचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खाजगी लोकांना (एजंट) शेतकर्‍यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे खासगी लोक शेतकर्‍यांकडे पंचनामा करण्यासाठी एकरी 200 ते 400 रुपयांची मागणी करत आहेत.

त्याशिवाय पंचनामे करत नाहीत. त्या संबधीत पैसे मागणार्‍या व्यक्तींचा शेतकर्‍यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला तर अरेरावाची भाषा करतात अशी लेखी तक्रार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पवार, सामाजीक कार्यकर्ते अनिल ताके, गणेश ताके, जय हनुमान शेतकरी गटाचे सचिव मोहन म्हस्के यांनी लेखी व व्हिडीओ पुराव्यानिशी केली होती. वृत्तपत्रे व सामाजिक माध्यमांनी हे प्रकरण धसास लावले होते. त्याची दखल घेत राज्याचे कृषीमंत्र्यांनी पंचनाम्यासाठी शेतकर्‍यांकडून पैसे उकळणार्‍या कृषी सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे, ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय इंगळे यांना निलंबित केले आहे.

निलंबनाचे तिघांचे आदेश

राज्याच्या कृषी सहसंचालकांनी कृषी सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे यांच्या निलंबनाचा आदेश काढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी दिली. चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढला असल्याची माहिती गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी दिली तर ग्रामपंचायत कर्मचारी संजय देवराम इंगळे याच्या निलंबनाचा आदेश चिलेखनवाडीच्या सरपंचांनी काढला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com